...तर भारतात कोरोना पुढच्या टप्प्यात जाणारच नाही; आरोग्य मंत्रालयाचा दिलासा

नागरिक आणि सरकारने एकत्रपणे काम केले नाही तरच भारतात कोरोना साथीच्या रोगाप्रमाणे फैलावायला सुरुवात होईल. 

Updated: Mar 26, 2020, 10:48 PM IST
...तर भारतात कोरोना पुढच्या टप्प्यात जाणारच नाही; आरोग्य मंत्रालयाचा दिलासा title=

नवी दिल्ली: देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा भरभर वाढत असतानाच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक दिलासादायक माहिती दिली आहे. त्यानुसार भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असला तरी प्रादुर्भावाचा वेग स्थिरावला आहे. त्यामुळे आता आपण सोशल डिस्टन्सिंग आणि योग्य उपचार या दोन गोष्टी काटेकोरपणे पाळल्या तर आगामी काळात देशात कोरोनाचा प्रादुर्भाव तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकणारच नाही, असे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. ते गुरुवारी दिल्लीतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. 

यावेळी त्यांनी म्हटले की, देशातील नागरिक आणि सरकारने एकत्रपणे काम केले नाही तरच भारतात कोरोना साथीच्या रोगाप्रमाणे फैलावायला सुरुवात होईल. परंतु, सोशल डिस्टन्सिंग व योग्य उपचार या दोन गोष्टी अंमलात आणल्या तर तशी वेळच येणार नाही. केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार सध्या १७ राज्यांमध्ये फक्त #COVID19 च्या उपचारासाठी रुग्णालयांच्या उभारणीला सुरुवात झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

भारतीय वैद्यक समितीच्या आर. केतकर यांनीही आरोग्य मंत्रालयाच्या मताशी सहमती दर्शविली आहे. सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी इतक्या परिणामकारक उपाययोजना राबवल्या जात आहेत. याचे काटेकोरपणे पालन केल्यास भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा फार वाढणार नाही, असे मत आर. केतकर यांनी व्यक्त केले.