होम क्वांरटाईन केलेल्या लोकांचे मोबाईल होणार ट्रॅक

मोबाईल टॉवर्सच्या माध्यमातून होम क्वारंटाईन व्यक्तीच्या आतापर्यंतच्या प्रवासाचीही माहिती घेतली जात आहे. 

Updated: Mar 31, 2020, 09:47 AM IST
होम क्वांरटाईन केलेल्या लोकांचे मोबाईल होणार ट्रॅक title=

अमरावती: परदेशातून परतल्यामुळे होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने एक नवी शक्कल शोधून काढली आहे. त्यानुसार या होम क्वारंटाईन असलेल्या लोकांचे मोबाईल ट्रॅक करण्यात येणार आहेत. जेणेकरून सरकारला त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवता येईल.

COVID-19 अलर्टिंग सिस्टीमच्या माध्यमातून राज्यातील साधारण २५ हजार होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांवर नजर ठेवण्यात येईल. यासाठी मोबाईल नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्यांची मदतही घेतली जात आहे. 
सध्याच्या घडीला आंध्र प्रदेश सरकारकडे होम क्वारंटाईन केलेल्या २५ हजार जणांचे मोबाईल क्रमांक आणि घराचा पत्ता आहे. या नागरिकांनी घरापासून १०० मीटरची हद्द ओलांडल्यास अलर्टिंग सिस्टीमकडून कंट्रोल रूमला संदेश जातो. यानंतर जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांना आदेश दिले जातात. या यंत्रणा संशयित रुग्णाशी संपर्क साधून त्याला घरी परतण्यास सांगतील. मात्र, संबंधित व्यक्तीने न ऐकल्यास त्याला ताब्यात घेण्यासाठी यंत्रणा तात्काळ सक्रिय होतील. 

याशिवाय, मोबाईल टॉवर्सच्या माध्यमातून होम क्वारंटाईन व्यक्तीच्या आतापर्यंतच्या प्रवासाचीही माहिती घेतली जात आहे. या व्यक्तीने आतापर्यंत कसा प्रवास केला याची संपूर्ण माहिती यामुळे यंत्रणांना उपलब्ध झाली आहे. त्यानुसार संबंधित व्यक्तीने १५ मिनिटांपेक्षा अधिक कालावधी कुठे व्यतीत केला, याचाही सरकारी यंत्रणांकडून माग काढला जात आहे. जेणेकरून या ठिकाणांची नाकाबंदी करून संबंधित परिसराचे निर्जंतुकीकरण केले जाईल, असा सरकारचा मानस आहे. याच माहितीच्या आधारे कोरोनाचे२० रुग्ण आढळून आलेल्या विविध भागांवर सध्या आंध्र प्रदेश सरकारडून पाळत ठेवली जात आहे.