नवी दिल्ली : अयोध्या वाद आणि कर्नाटकच्या १७ अपात्र आमदारांवर निर्णय सुनावल्यानंतर सर्वोच्च न्यायालय आज तीन आणखी मोठ्या प्रकरणांवर आपला निर्णय सुनावणार आहे. तसेच दिल्लीच्या साकेत न्यायालयात मुजफ्फरपूर प्रकरणी निर्णय सुनावला जाऊ शकतो. राफेल आणि सबरीमाला प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर आज सकाळी साडे दहा वाजता निर्णय सुनावला जाईल. याव्यतिरिक्त काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'चौकीदार चोर है' विधानावर त्यांच्यावर कारवाई होणार का ? यावर सुनावणी होईल.
राफेल प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालय साडे दहा वाजता निर्णय देईल
लोकसभा निवडणुकी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून राहुल गांधी यांनी १० एप्रिल रोजी वादग्रस्त विधान केले होते. भाजपा खासदार मीनाक्षी लेखी यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या या विधानाबद्दल न्यायालयची माफी मागितली आहे.
सबरीमाला प्रकरणावर दाखल पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी होईल. सबरीमाला मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना प्रवेश दिला गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या. सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर पुनर्विचार करावा असे यात म्हटले आहे.
मुजफ्फरपूर लैंगिक शोषणप्रकरणी दिल्लीचे साकेत न्यायालय आज निर्णय सुनावणार आहे. ब्रजेश ठाकूर सहीत २१ आरोपींवर न्यायालय निर्णय देईल. याप्रकरणी पॉस्को एक्ट अंतर्गत इतर प्रकरणांमध्ये तक्रार दाखल झाली आहे. यातील आरोपींना दहा वर्ष ते आजीवन कारावसाची शिक्षा होऊ शकते.