नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल सोमवारी (१८ डिसेंबर) लागणार आहे.
गुजरात विधानसभेच्या १८२ जागांचे निकाल लावण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केलीय. ३३ शहरांमध्ये निवडणूक आयोगाची कंट्रोल रूम असणार आहेत.
मतमोजणीसाठी ३० हजारांहून अधिक कर्मचारी तैनात असणार आहेत. निवडणूक आयोगाची मुख्य कंट्रोल रूम गांधीनगरमध्ये असणार आहे.
मतमोजणीदरम्यान कोणाताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी गुजरातमध्ये चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आलीय.
गुजरातबरोबरच हिमाचल प्रदेश निवडणुकीचाही सोमवारी निकाल लागणार आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ जागांसाठी मतमोजणी होणार आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये यंदा सरासरी ७५ टक्के मतदान झालंय. त्यामुळे वाढीव मतदान कुणाच्या पारड्यात पडणार याबाबत उत्सुकता आहे.
मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सर्व यंत्रणाही सज्ज झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे मुख्यमंत्री विरभद्र सिंग आणि माजी मुख्यमंत्री प्रेमकमुरा धुमल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
हिमाचलमध्ये मुख्य लढत काँग्रेस आणि भाजप यांच्यात आहे. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताबदल हा हिमाचल प्रदेशचा आतापर्यंतचा इतिहास आहे. ही परंपरा कायम राखत, यावेळी काँग्रेसकडून भाजप सत्ता हिसकावणार का याबाबत, राजकीय जाणकारांमध्ये उत्सुकता आहे.
हिमाचलमध्ये कोण मारणार बाजी?