नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वेगानं वाढत आहे. गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण आणि बुस्टर डोससाठी सरकारकडून मोहीम सुरू आहे. देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने कहर केला आहे.
मुंबई आणि दिल्लीत दररोज हजारो लोक कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. ही लाट कधी संपणार आणि कधी कोरोनापासून सुटका मिळणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर नुकतीच मोठी अपडेट समोर आली आहे.
IIT कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी गणितीय मॉडेलच्या आधारे सांगितले आहे की कोरोनाचा वाढता संसर्ग आणखी एक महिना असणार आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना शिगेला पोहोचेल. त्यानंतर 15 फेब्रुवारीपासून नवीन रुग्णांची संख्या कमी होण्यास सुरुवात होईल.
पुढच्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्याच वेळी देशात रोज 8 लाखहून अधिक रुग्णसंख्या वाढताना दिसणार आहे. त्यानंतर हळूहळू कोरोनाचा हा कहर कमी होताना दिसेल असंही अग्रवाल यांचं म्हणणं आहे.
मार्चपर्यंत कोरोनाची तिसरी लाट संपेल असा दावा अग्रवाल यांनी केला आहे. प्रोफेसर अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, संसर्ग जितक्या वेगाने वाढेल तितक्या वेगानं तो कमी होईल. ज्या शहरांमध्ये केसेस कमी आहेत तिथे केसेस वाढू शकतात, पण मुंबईत हे प्रमाण शिखरावर आले आहे. दिल्लीचीही तीच स्थिती आहे.