नवी दिल्ली : कोरोनाचे रुग्ण आणि संकट भारतात दिवसेदिवस वाढत असले तरी एक चांगली बातमी आहे. भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचा दर कमी झाला आहे. तो केवळ कमी झाला आहे असं नाही, तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचं प्रमाण जगात सर्वात कमी भारतात आहे.
केंद्रीय गृह आणि आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. भारतात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे, अशी माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली.
भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण २.८७ टक्के इतके आहे. १५ एप्रिलला ते ३.३ इतके होते. आता ते २.८७ इतकं म्हणजे जगात सर्वात कमी आहे, असा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे.
भारतात कोरोनाचे ६० हजार ४९० रुग्ण बरे झाले आहेत. देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही सुधारले असून ४१.६१ टक्के इतके झाले आहे.
4.4 deaths per lakh population have been reported for the world, while India has reported about 0.3 deaths per lakh population, which is amongst the lowest in the world. This has been due to lockdown, timely identification and management of #COVID19 cases. - @MoHFW_INDIA pic.twitter.com/oVJIhIsOK6
— PIB India #StayHome #StaySafe (@PIB_India) May 26, 2020
आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितलं की गेल्या काही महिन्यांत देशात कोरोना टेस्टही वाढल्या आहेत. देशात रोज एक लाख दहा हजार टेस्ट होत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
जगात एक लाख लोकसंख्येमागे ४.४ मृत्यू होतात. भारतात एक लाख लोकांमध्ये मृत्युचं प्रमाण ०.३ इतके आहे. हे प्रमाण जगातील सर्वात कमी मृत्युदर असलेल्या देशांपैकी एक आहे. लॉकडाऊन, वेळेवर रुग्ण ओळखणे आणि कोरोना रुग्णांचं योग्य व्यवस्थापन यामुळे भारतात सर्वात कमी मृत्युदर असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
जगात एक लाख लोकसंख्येमागे ६९.९ कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर भारतात एक लाख लोकसंख्येमागे १०.७ इतके रुग्ण कोरोना बाधित आहेत.
देशात एकीकडे कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना जगाच्या तुलनेत ते प्रमाण कमी असल्याचा आरोग्य मंत्रालयाचा दावा आहे.