नवी दिल्ली : जगभरात एकीकडे कोरोनाचा धोका वाढत आहे. दुसरीकडे शस्त्रज्ञ नव्या वर्षाअखेरीस कोरोनाचा धोका संपेल असाही दावा करत आहेत. नव्या वर्षात चांगली बातमी मिळू शकते, असे संकेत संशोधकांनी दिलेत. ओमायक्रॉन हा कोरोनाचा शेवट असेल, असं शास्त्रज्ञ का म्हणतायत?
कोरोना गेल्या दोन वर्षांपासून सा-या जगासाठी डोकेदुखी होत आहे. त्यात ओमायक्रॉनमुळे पुन्हा एकदा सर्वांची चिंता वाढली आहे. पण आता काळजी करण्याचं कारण नाही. नव्या वर्षात कोरोना हा आजार सर्दी, तापाप्रमाणे सामान्य होईल आणि त्याचा खात्मा होईल, असे संकेत संशोधकांनी दिलेत. ओमायक्रॉन व्हेरियंट ही कोरोनाच्या विनाशाची सुरूवात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
संशोधकांच्या दाव्यानुसार, एखाद्या देशातील 60 ते 70 % लोकांमध्ये अँटीबॉडिज विकसित झाल्यास नव्या व्हायरसचा मानवी शरीरावर फारसा परिणाम होणार नाही. कोरोनातून बरे झालेले आणि लसीकरण झालेल्या 70 ते 80 % लोकांमधील टी सेल्स ओमायक्रॉनविरोधात काम करत आहेत. त्यामुळे रूग्णांची संख्या कितीही वाढली तरी कोरोना फारसा घातक असणार नाही, असंही या संशोधकांचं म्हणणं आहे.
याबाबत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं केलेल्या अभ्यासातही दिलासादायक निष्कर्ष हाती आलेत. रूग्णालयात भरती झालेले ओमायक्रॉनचे रूग्ण तीन दिवसात बरे होतात, असं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या आरोग्य विभागाचे प्राध्यापक सर जॉन बेल यांनी सांगितलं आहे .
ओमायक्रॉनची लक्षणं सौम्य असून ती व्हायरल इन्फेक्शनप्रमाणे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर काही तज्ज्ञांनी कोरोना व्हायरसच्या म्युटेशनचा पॅटर्न स्पॅनिश फ्लूप्रमाणे असल्याचा दावा केला आहे. स्पॅनिश फ्लूच्या दोन लाटा अतिशय घातक होत्या. मात्र तिस-या लाटेनंतर स्पॅनिश फ्लू संपुष्टात आला.
भारतासह जगभरातील सर्वच तज्ज्ञांनी कोरोना महामारीचा अंत जवळ आल्याचं म्हटलं जात आहे. जगासाठी हे निश्चितच आशादायी चित्र आहे. मात्र याचा अर्थ सर्वांनी गाफील राहावं असं मुळीच नाही. ओमायक्रॉन खतरनाक वाटत नसला तरी त्याचा उद्रेक होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे.