नवी दिल्ली : रशियाकडून russia विकसित करण्यात आलेली कोविड 19 वरील लस Sputnik V संदर्भात भारत आणि रशिया या दोन्ही राष्ट्रांमध्ये अत्यंत महत्त्वाची चर्चा सुरु असल्याची बाब समोर येत आहे. केंद्रानंच मंगळवारी याबाबतची माहिती दिली. सध्याच्या घडीला या संदर्भातील प्राथमिक माहिती समोर आली आहे. गॅमेलिया रिसर्च इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमियोलॉजी एंड माइक्रोबायोलॉजीनं रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडच्या साथीनं लस तयार केल्याचं कळत आहे. ११ ऑगस्टला ही लस अधिकृतपणे नोंदवण्यात आली.
एका पत्रकार परिषदेमध्ये आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी याबाबतची माहिती देत लिहिलं, स्पुटनिक v बाबत सांगावं तर, भारत आणि रशियामध्ये यासंदर्भातील चर्चा सुरु आहेत. याबाबतची प्राथमिक माहिती समोर आली असून, अधिक विस्तृत माहितीची प्रतीक्षा आहे. यादरम्यानच भारतात तीन लसींची चाचणी प्रगतीपथावर आहे.
coronavirus कोरोनावर मात करण्यासाठी म्हणून सुरु असणाऱ्या प्रयत्नांमध्ये रशियन लसीची बरीच चर्चा सुरु आहे. या प्रक्रियेमध्ये सप्टेंबर महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर लसीच्या उत्पादनास सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गानं अनेकांना संक्रमित केलं असून, या व्हायरसमुळं लाखोंच्या संख्येने लोकांना आपल्या प्राणांनाही मुकालं लागलं आहे. भारतामध्येही कोरोना रुग्णांची संख्या अतिशय झपाट्यानं वाढताना दिसत आहे. यामध्ये रुग्ण बरे होण्याचं प्रमाण किमान दिलासादायक बाब ठरत आहे. आतापर्यंत भारतात कोरोनातून २४ लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले असून देशाची एकूण रुग्णसंख्या ३१,६७,३२४ इतकी झाली आहे.