CORONA : देशात दररोज वाढत आहेत इतके रुग्ण; ही साखळी तोडणं तुमच्या हातात

लढा जिंकायचा निर्धार करा, आणि....   

Updated: Mar 29, 2020, 11:28 PM IST
CORONA : देशात दररोज वाढत आहेत इतके रुग्ण; ही साखळी तोडणं तुमच्या हातात  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : CORONAVIRUS कोरोना व्हायरसने चीनमधील वुहान शहरात धुमाकूळ घातला. पाहता पाहता संपूर्ण जगभरात या विषाणूची लागण होण्यास सुरुवात झाली. प्राथमिक स्तरावरुन अतिगंभीर परिस्थितीपर्यंतच्या टप्प्यापर्यंत पोहोचणाऱ्या आणि मानवी जीवनाला संकटात टाकणाऱ्या या ,व्हायरसने भारतातही दहशत पसरवली आहे. 

भारतात तापमानात होणारी वाढ पाहता व्हायरस फार काळ तग धरु शकणार ऩाही, असे तर्क अनेकांनी लावले. पण, प्रत्येक तर्काला शह देत हा व्हायरस अतिशय वेगाने फोफावत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची एकंदर संख्या पाहता आणि वाढती आकडेवारी पाहता याचा सहज अंदाज लावला येत आहे. 

कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर पुढे हीच रुग्णसंख्या तीनवर पोहोचेपर्यंत जवळपास एक महिन्याभराचा काळ लोटला होता. पण, पाहता पाहता तीनाचे पाच, पाचवरुन बेचाळीस आणि अवघ्या काही दिवसांमध्ये म्हणजेच मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा हजारांच्याही पलीकडे गेला आहे. 

 

जिथे २ मार्चला अवघे पाच रुग्ण होते तिथेच महिना संपलेला नसताना म्हणजेच २९ मार्चला रुग्णसंख्या १०२४ इतकी झाली. ज्या झपाट्याने कोरोना विषाणू भारतात वाढत आहे, ते पाहता नागरिकांनी आता तरी लॉकडाऊन गांभीर्याने घेण्याची प्रकर्षाने गरज आहे. वारंवार इशारा देऊनही बेजबाबदार वर्तन संपूर्ण देशाला एका वेगळ्याच संकटात टाकू शकतं ही बाब लक्षात घेत आतातरी स्वयंशिस्त अंगी बाणवत घरातच राहा आणि कोरोनाला टाळा असंच आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. विचार करा..... मुद्दा आणि संकट गंभीर आहे. पण, त्यावरचा उपायही तुमच्याच हातात आहे; विचार करा....!