नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढतोच आहे. कोरोना व्हायरस हवेतून पसरत नाही, मात्र तो पृष्ठभागावर काही तासांपर्यंत जिवंत राहू शकतो. कोरोना व्हायरसबाबत आणखी एक खुलासा करण्यात आला आहे. कोरोना व्हायरस दररोज वापरात असलेल्या नोटांवर सर्वाधिक काळ राहत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
हाँगकाँग यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक नोटा, स्टील आणि प्लास्टिकच्या पृष्ठभागावर तो अनेक दिवसांपर्यंत जिवंत राहू शकत असल्याचं सांगितलं आहे.
ब्रिटनमधील सर्वात प्रतिष्ठित मेडिकल पत्रिका 'लॅसेन्ट'मध्ये छापण्यात आलेल्या संशोधनानुसार, प्रिंटिंग आणि टिशू पेपरवर हा व्हायरस तीन तासांपर्यंत तर लाकूड किंवा कपड्यावर एक दिवसापर्यंत राहू शकतो. काच आणि नोटांवर हा व्हायरस चार दिवस तर स्टेनलेस स्टिल आणि प्लास्टिकवर चार ते सात दिवसांपर्यंत राहू शकत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, एका अभ्यासातून कोरोना व्हायरस स्टेनलेस स्टिल आणि प्लास्टिकच्या पृष्ठभागावर चार दिवसांपर्यंत राहू शकतो. तर चेहऱ्यावर लावण्यात येणाऱ्या मास्कच्या बाहेरील भागावर आठवडाभरापर्यंत जिवंत राहू शकतो, असं सांगण्यात आलं आहे.
संशोधकांनी हा व्हायरस, घरात वापरल्या जाणाऱ्या साबण आणि पाण्याने वारंवार हात धुतल्याने व्हायरस जिवंत राहू शकत नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळेच वारंवार सर्वांना सतत हात धुण्याचं सांगण्यात येत आहे. कुठल्याही वस्तूवर, पृष्ठभागावर हात लावल्यानंतर ते हात चेहरा, तोंड, डोळे, नाकाला लावू नये. तोंडाला किंवा चेहऱ्याला हात लावण्यापूर्वी ते पाण्याने स्वच्छ धुण्याचा सल्ला दिला जात आहे.
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. चीनपासून सुरु झालेला कोरोना आता जगातील 200 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. अनेक बलाढ्य देशही कोरोनाचा सामना करण्यात, कोरोनासमोर हतबल ठरत आहेत. जगभरात कोरोना रुग्णांचा आकडा 11 लाखांहून अधिकवर गेलाय. तर जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 59 हजारांवर पोहचली आहे.