Corona Cases Latest Updates : संपूर्ण जगाला संकटात टाकणारा कोरोना संसर्ग आता पुन्हा एकदा डोकं वर काढत असून, सर्वांच्याच चिंतेत भर टाकताना दिसत आहे. सध्याच्या घडीला भारतात कोरोना संसर्गाच्या प्रमाणात वाढ होताना दिसत असून, देशात नव्यानं भर पडणाऱ्या आणि संक्रमित होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 या व्हेरियंटच्या बाधितांची संख्या भारतात वाढू लागली आहे. सोमवारी कर्नाटकात JN1 व्हेरिएंटचे एकूण 34 रुग्ण आढळले. तर, तिघांचा मृत्यू झाला. दुसरीकडे केरळमध्येही कोरोनाचा उद्रेक झाला आहे. इथं एकाच दिवसात कोरोनाचे 115 नवीन बाधित आढळले. ज्यामुळं केरळमधील कोरोना रुग्णांची संख्या 1,749 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात 28 नव्या रुग्णांचं निदान झालं असून आतापर्यंत JN1 व्हेरियंटचे 10 सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोनाच्या JN1 या व्हेरिएंटच्या संसर्गाची बाब ऑगस्ट महिन्यात निदर्शनास आली होती. निरीक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोनाचा हा व्हेरिएंट सब व्हेरिएंट BA.2.86 पासून तयार झाल्याचं सांगण्यात येतं. 2023 च्या सुरुवातीपासूनच BA.2.86 च्या बाधितांची संख्या वाढल्याचं सांगण्यात येतं.
कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट झपाट्यानं पसरत असला तरीही नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन यंत्रणा करताना दिसत आहेत. सर्वसामान्य सर्दी- खोकला, ताप, अंगदुखी अशीच या व्हेरिएंटच्या संसर्गाची लक्षणं असून, त्यामुळं कोणताही धोका नसल्याचं कोरोना टास्क फोर्समधील माजी सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी स्पष्ट केलं आहे.
सध्या देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली असून या थंडीचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांचे पाय या राज्यांकडे वळत आहेत. मुख्य म्हणजे इथं होणारी गर्दी येत्या काळात कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणाऱ्या वाढीमध्ये रुपांतरित होऊ शकते अशीच भीती आता व्यक्त केली जात आहे. सध्याच्या घडीला स्पिती व्हॅलिच्या दिशेनं 65 हजारहून अधिक पर्यटक रवाना झाले आहेत. कोरोनाची दहशत कायम असताना ही गर्दी नियंत्रणात न राहिल्यास मोठा धोका उदभवू शकतो ही शक्यता नाकारली जात नाही.