Corona: भारतात दुसऱ्या लाटेचा कहर कधीपर्यंत राहणार, IIT शास्त्रज्ञांचा दावा

भारतात कोरोनाचा कहर अजून काही दिवस कायम राहणार....

Updated: Apr 23, 2021, 07:00 PM IST
Corona: भारतात दुसऱ्या लाटेचा कहर कधीपर्यंत राहणार, IIT शास्त्रज्ञांचा दावा title=

मुंबई : भारतात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. रुग्ण वेगाने वाढत आहेत आणि लोक आपला जीव गमावत आहेत. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की कोरोना महामारी कधी संपेल. ही आकडेवारी आणखी वाढेल का? दरम्यान, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) च्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, दुसर्‍या वेव्हचा शिखर कधी येईल. शास्त्रज्ञांनी त्यांच्या मॉडेलच्या आधारे असा अंदाज लावला आहे की भारतात कोरोना विषाणूच्या साथीची दुसरी लाट 11 ते 15 मे दरम्यान शिगेला जाईल.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, त्यावेळी देशातील रूग्णांची संख्या 33 ते 35 लाखांपर्यंत पोहोचू शकते आणि त्यानंतर मेच्या अखेरीस रुग्णांच्या बाबतीत घट होईल. शुक्रवारी एकाच दिवशी संसर्गाची 3,32,730 (3.32 लाख) नवीन रुग्ण वाढले असून 2263 लोकांचा मृत्यू झाला होता. यासह, देशातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 24,28,616 पर्यंत वाढली आहे.

आयआयटी कानपूर आणि हैदराबादच्या शास्त्रज्ञांनी मॉडेलच्या आधारे असं मत व्यक्त केलं की, मे मध्ये मध्यापर्यंत उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 10 लाखांवर वाढू शकते.'

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि तेलंगणा नवीन प्रकरणांच्या बाबतीत 25 ते 30 एप्रिल दरम्यान नवीन उंची गाठू शकतील, तर महाराष्ट्र आणि छत्तीसगड आधीपासूनच नवीन केसेसच्या बाबतीत शिखरावर पोहोचले असतील.

आयआयटी कानपूरच्या संगणक विज्ञान विभागातील प्राध्यापक मनिंदर अग्रवाल यांनी सांगितले की, "आम्हाला आढळले की 11 ते 15 मे दरम्यान उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या वाढण्याचे तार्किक कारण आहे. 33 ते 35 लाखांपर्यंत ही संख्या वाढू शकते. ही वेगवान वाढ आहे परंतु त्याच वेळी नवीन प्रकरणे खाली येण्याची शक्यता आहे आणि मेच्या अखेरीस त्यात घट होईल.'

या महिन्याच्या सुरूवातीस असे मानले जात आहे की 15 एप्रिलपर्यंत देशात संसर्गाचे प्रमाण शिगेला पोहचेल पण हे खरे ठरले नाही. अग्रवाल म्हणाले, "सध्याच्या टप्प्यासाठी आमच्या मॉडेलचे मापदंड सतत बदलत असतात, त्यामुळे अचूक अंदाज घेणे कठीण आहे. दैनंदिन घडामोडींमध्येही थोडा बदल केल्यास शिखरांची संख्या हजारो वाढू शकते.'