देशभरात लॉकडाऊनमुळे भाज्यांच्या दरात वाढ

लॉकडाऊनमुळे नफेखोरांकडून महागाई वाढवण्याचा प्रयत्न

शैलेश मुसळे | Updated: Mar 27, 2020, 09:44 AM IST
देशभरात लॉकडाऊनमुळे भाज्यांच्या दरात वाढ title=

मुंबई : कोरोनाच्या भीषण संकटामुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान मोदींनी जाहीर केला आणि लोकांनी बाजाराकडे धाव घेतली. २१ दिवस घरात धान्य आणि भाजी यांची कमतरता भासू नये म्हणून लोकांनी बाजारात गर्दी केली. पण लॉकडाऊनमुळे भाज्यांचे दर गगनाला भिडत आहेत. दोन दिवसांत भाज्यांचे दर ३० टक्क्यांनी वाढले आहेत. पुरवठा कमी झाल्याने महागाईचा घाऊक बाजारात परिणाम झाला आहे. आवश्यकते शिवाय लोकांना घराबाहेर पडू नये म्हणून सरकार वारंवार आवाहन करत आहे. पण लोकं भाज्या खरेदी करण्यासाठी रोज संध्याकाळी बाजारात गर्दी करत आहेत.

बाजारात मागणी आणि पुरवठ्याचे अंतर वाढत आहे. संधीच्या शोधात बसलेले नफाखोर आता भाजी मार्केटमध्ये महागाई वाढवत आहेत. देशातील कोरोनामुळे सर्व व्यवसाय बंद असले तरी भाज्यांचा व्यवसाय चांगलाच चमकत आहे. लॉकडाऊन दरम्यान दोन दिवसात भाजीपाल्याचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत.

बुधवारी लॉकडाऊनची अंमलबजावणी होताच त्याचा प्रभाव गुरुवारी स्पष्टपणे दिसून आला. पुरवठा ५० टक्क्यांनी कमी झाला आहे.

बटाटे १६ वरुन ३० रुपये किलो

कांदा २० वरुन ३० ते ४० रुपये किलो

टोमॅटो १५ वरुन ३० रुपये किलो

सफरचंद १२० वरुन २०० रुपये किलो

पपई ८५ वरुन १२० रुपये

लॉकडाऊननंतर भाजीपाला वाहतुकीचा खर्च १५० ते ४०० रुपयांपर्यंत वाढला असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. म्हणजेच स्थानिक वाहतुकीच्या भाड्यात दुपटीने वाढ झाली आहे.