Coromandel Train Accident Update : रक्ताचं नातं नसणाऱ्यांनाच रक्त द्यायला ओडिशात रांगाच रांगा, माणुसकी पाहून डोळे पाणावतील

Coromandel Train Accident Update : शनिवारची सकाळ झाली ती म्हणजे ओडिशातील भयंकर अपघाताच्या वृत्तानं. शुक्रवारी रात्री ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघातात मृतांचा आकडा सातत्यानं वाढतोय...   

सायली पाटील | Updated: Jun 3, 2023, 09:40 AM IST
Coromandel Train Accident Update : रक्ताचं नातं नसणाऱ्यांनाच रक्त द्यायला ओडिशात रांगाच रांगा, माणुसकी पाहून डोळे पाणावतील  title=
Coromandel Train Accident People gathered to donate blood for injured people in Balasore humanity wins

Coromandel Train Accident Latest News : ओडिशातील कोरोमंडल रेल्वे अपघातानंतर एकच हाहाकार माजला. सुरुवातीला 50 जणांचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आणि काही तासांतच मृतांचा आकडा 288 वर पोहोचला. सध्याच्या घडीला स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार या अपघातातील जखमींची संख्या 900 हूनही जास्त असून, अद्यापही बचावकार्य सुरुच आहे. त्यामुळं हे आकडे आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

'आम्ही रक्तदान करण्यासाठी आलोय...'

ओडिशामध्ये झालेल्या महाभयंकर अपघातानंतर राज्यातील बालासोर वैद्यकिय महाविद्यालयात रात्री एकाएकी नागरिकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. इथं परिस्थिती गोंधळाचीच होती. रुग्णवाहिकांचे सायरन, जखमींच्या किंकाळ्या, मृतांच्या परिजनांचे आक्रोश अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळाली. या साऱ्यामध्ये मोठ्या संख्येनं रक्तदानासाठी पुढे सरसावलेले तरुण तिथं देवदूतासारखे हजर झाले. 

रेल्वे अपघाताची माहिती मिळताच आणि व्हिडीओ व्हायरल होताच परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात आलं आणि या भागातच असणारा युवा वर्ग मोठ्या संख्येनं रक्तदानासाठी रुग्णालयाच्या दिशेनं आला. परिणामस्वरुप अतिशय कमी वेळातच साधारण 2000 तरुणांनी रक्तदानासाठी नोंदणी केली आणि तातडीनं 900 युनिट रक्तही रक्तपेढीत जमा झालं. जखमींवर उपचार करण्यासाठी हा एक मोठा आधारच ठरला. 

कोणत्याही प्रवाशाशी रक्ताचं नातं नसतानाही त्यांचं आयुष्य वाचवण्यासाठी ही मंडळी रक्तदानासाठी उत्स्फूर्तपणे पुढे सरसावले आणि इथे माणुसकीच जिंकल्याचं पाहायला मिळालं. आता जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी हीच एक आशा. 

ती काळरात्र... 

ओडिशातील बहानागा स्थानकाजवळ शुक्रवारी हा भीषण अपघात झाला. या अपघातात 2 एक्स्प्रेस गाड्या आणि एक मालगाडी एकमेकांवर धडकल्याने क्षणात हाहाकार माजला आणि होत्याचं नव्हतं झालं. कोलकात्याहून चेन्नईकडे जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस, यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस आणि मालगाडीची धडक झाली. 

हेसुद्धा वाचा : ओडिशा रेल्वे अपघातानंतर Indian Railway चं वेळापत्रक कोलमडलं; वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पणही रद्द

यशवंतपूरहून हावड्याकडे जाणारी एक्स्प्रेस संध्याकाळी 7 वाजता बालासोरजवळ रुळावरून घसरली. त्या गाडीचे काही डबे दुसऱ्या ट्रॅकवर उलटले आणि ते दुसऱ्या ट्रॅकवर उभ्या शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसला धडकले. त्यानंतर कोरोमंडल ट्रेनचेही काही डबे रुळावरून घसरले आणि ते डबे बाजूच्याच ट्रॅकवर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकले. अपघाताचं स्वरुप इतकं भीषण होतं की कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे पूर्णपणे उलटले.