हैदराबादमध्ये लढून दाखवा, ओवेसींचं मोदी-शाहंना थेट आव्हान

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भाजप अध्यक्ष अमित शाहंना थेट आव्हान दिलं आहे.

Updated: Jun 30, 2018, 04:55 PM IST
हैदराबादमध्ये लढून दाखवा, ओवेसींचं मोदी-शाहंना थेट आव्हान title=

हैदराबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भाजप अध्यक्ष अमित शाहंना थेट आव्हान दिलं आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी-शाहंनी माझ्याविरुद्ध हैदराबादमधून निवडणूक लढवून दाखवावी असं ओवेसी म्हणालेत. एका कार्यक्रमामध्ये ओवेसींनी भाजप आणि काँग्रेसवर निशाणा साधला. माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी संघ मुख्यालयाला दिलेल्या भेटीवरून ओवेसींनी भाजप-काँग्रेसवर टीका केली. मोदी-शाहंबद्दल बोलताना ओवेसींनी काँग्रेसलाही आव्हान दिलं. भाजप आणि काँग्रेसनं एकत्र येऊन माझ्याविरुद्ध हैदराबादमधून लढून दाखवावं. हे दोघं मिळूनही मला हरवू शकत नाहीत, असं ओवेसी म्हणाले.

काहीच दिवसांपूर्वी ओवेसींनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मुस्लिमांनी फक्त मुस्लिम उमेदवारालाच मतदान करावं, असं ओवेसी म्हणाले होते. ७० वर्ष फक्त मुसलमानांचा वापरच केला गेला. आम्हाला घाबरवण्यात आलं. आम्हाला आई-बहिणीवरून शिव्या देण्यात आल्या. हापूडमध्ये समूहाकडून झालेल्या हत्येवरूनही ओवेसींनी टीका केली. मोदीजी हे तुमच्या राज्यात होत आहे. हाच सबका साथ सबका विकास आहे का? असा सवाल ओवेसींनी उपस्थित केला आहे.