200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी महाठग सुकेश चंद्रशेखरने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला जेलमधून पाठवलेले डझनभर व्हॉट्सअप मेसेज समोर आले आहेत. दरम्यान सुकेशने आपण हे मेसेज पाठवले नसल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या आधारे आपल्या आवाजातील मेसेज पाठवले असल्याचंही त्याचं म्हणणं आहे. तसंच जॅकलिनला मेसेज पाठवण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रमांक वापरला असल्याचा दावा करत त्याने आयपी अँड्रेसच्या आधारे त्याला शोधू शकतो असं सांगितलं आहे. त्याने याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
जॅकलीनला मेसेज पाठवणाऱ्यांविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई केली जावी अशी मागणी सुकेशने केली आहे. "मला हे स्पष्ट करायचं आहे की, मी जेलमधून कोणतेही व्हॉट्सप किंवा व्हॉइस मेसेज पाठवलेले नाहीत," असा दावा सुकेशने केला आहे.
30 जून 2023 रोजी पाठवण्यात आलेल्या मेसेजमध्ये सुकेशने लिहिलं होतं की, "बेबी, या महिन्यात 6 तारखेला आपली कोर्टाची तारीख आहे. जर तुला सुनावणीसाठी हजर केलं तर काळा कुर्ता किंवा काळ्या रंगातील कोणतेही कपडे घाल. जेणेकरून मला तू माझे सर्व संदेश पाहिले आहेत आणि तुझं प्रेम कायम आहे हे मला समजेल. बेबी मला तुझी फार आठवण येत आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. तू कायमची माझी आहेस".
'बेबी तू कोर्टात काळे कपडे घालून येत', सुकेशचे जेलमधून जॅकलीनला मेसेज, 'आता लवकरच बाळाला...'
पण सुकेशचं म्हणणं आहे की, जर मला प्रेम व्यक्त करायचं असेल तर ते कायदेशीर मार्गाने करेन. त्यासाठी मी अशा बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करणार नाही. दरम्यान एका मेसेजमध्ये सुकेशने जॅकलीन आपल्याला दुर्लक्षित का करत आहे हे समजण्यास मार्ग नसल्याचं म्हटलं होतं. सुकेशने हे मेसेज दिल्लीच्या मंडोली जेलमधून पाठवले होते.
सुकेशने पत्रातून आरोप केला आहे की, जॅकलीनच्या इंस्टाग्राम अकाऊंटला जवळपास 20 मिलियन खोटे फॉलोअर्स मिळवण्यासाठी मी कशाप्रकारे सोशल मीडिया मॅनेजमेंटला करोडो रुपये ट्रान्सफर केले याचाही तपास केला जावा. तसंच जॅकलीनला फॉलोअर्सच्या बाबतीत कतरिना कैफशी स्पर्धा करायची असल्याचाही दावा त्याने केला आहे.
"पुढच्या काही आठवड्यांत लव्ह रंजन तुझ्याशी एका चित्रपटासाठी संपर्क साधेल. मी त्याच्याशी करार केला आहे. ही तुझ्यासाठी खूप मोठी संधी असून, माझ्याकडून तुझ्यासाठी भेट आहे. मी तुला एक मेसेज कार्ड पाठवले होते. तुला ते आवडलं असेल आणि पाहिलं असशील अशी आशा आहे,” असंही त्याने एका संदेशात लिहिलं होतं.
दरम्यान सध्या जॅकलिनने केलेल्या आरोपांमुळे सुकेश चंद्रेशखरनेही तिच्यावर प्रत्यारोप केले आहेत. सुकेशच्या धमक्यापासून संरक्षण मिळावे यासाठी जॅकलीनने अलीकडेच दिल्ली न्यायालयात धाव घेतली. मी निष्पाप बळी आहे असं म्हणत तिने तिच्यावरील खटला रद्द करण्याची मागणीही केली आहे.