नवी दिल्ली: काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी पक्षनेतृत्त्वाविषयी घेतलेल्या भूमिकेनंतर आता पक्षात दोन उभे तट पडले आहेत. काँग्रेस कार्यकारिणीच्या आजच्या बैठकीत सोनिया गांधी यांच्याकडून अध्यक्षपदाचा राजीनामा दिला जाण्याची शक्यता आहे. यानंतर राहुल गांधी यांनीही अध्यक्षपद न स्वीकारल्यास गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती या पदावर विराजमान होऊ शकते.या पार्श्वभूमीवर पक्षातील एका गटाने काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी घराण्यातील व्यक्तीच कशाप्रकारे योग्य आहे, ही भूमिका लावून धरली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते राजीव सातव यांनीही सोनिया गांधी यांना पत्र लिहून या भूमिकेला पाठिंबा दर्शविला आहे.
'गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष काँग्रेसची गेलेली पत पुन्हा मिळवून देऊ शकत नाही'
या पत्रात सातव यांनी सोनियांना उद्देशून म्हटले आहे की, तुम्ही कठीण परिस्थितीचा सामना करत आहात, हे आम्हाला माहिती आहे. तरीही तुम्हीच पक्षाचे नेतृत्त्व करावे, ही आमची नम्र विनंती आहे. काँग्रेस पक्ष हा केवळ तुमच्या किंवा राहुलजींच्या हातात सुरक्षित आहे. आता किंवा भविष्यात तुमच्याशिवाय इतर कोणीही काँग्रेस पक्षाला न्याय मिळवू देऊ शकत नाही, असे राजीव सातव यांनी म्हटले आहे.
'पृथ्वीराज, वासनिक, देवरांना लाज वाटली पाहिजे', काँग्रेसमधला वाद पेटला
तुमच्या नेतृत्त्वावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. तुम्ही कठीण काळात काँग्रेसची सूत्रे हाती घेतलीत. काँग्रेस सत्तेत येईल असे कोणालाही वाटत नव्हते, त्या काळात तुम्ही संयुक्त पुरोगामी आघाडीचे UPA सरकार स्थापन करून दाखवलेत. डॉ. मनमोहन सिंग यांना हाताशी धरून तुम्ही शांतपणे आणि सुसूत्रता ठेवून देशासाठी काम केले. त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक पातळीवर देशाचा विकास झाला. सध्याच्या जुमलेबाजीच्या आणि कर्कश प्रपोगंडाच्या तुमच्या राजकारणाने देशाला बरेच काही मिळवून दिले, असे राजीव सातव यांनी पत्रात म्हटले आहे.