'अमित शाहांना इतिहास ठाऊक नाही असं वाटतं, नेहरुंनी भारतासाठी...'; राहुल गांधींचं जशास तसं उत्तर

Rahul Gandhi Slams Amit Shah: प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी अमित शाहांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. अमित शाहांनी सोमवारी पंडित जवाहरलाल नेहरुंबद्दल विधान केलं होतं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 12, 2023, 03:52 PM IST
'अमित शाहांना इतिहास ठाऊक नाही असं वाटतं, नेहरुंनी भारतासाठी...'; राहुल गांधींचं जशास तसं उत्तर title=
प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधींची प्रतिक्रिया

Rahul Gandhi Slams Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद 370 बद्दल चर्चा करताना देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी या टीकेला उत्तर दिलं आहे. अमित शाहांनी संसदेमध्ये केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना राहुल गांधींनी गृहमंत्र्यांच्या इतिहासासंदर्भातील ज्ञानावरुन टोला लगावला आहे. 

महत्त्वाचे मुद्दे हे आहेत

महत्त्वाच्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्याच्या उद्देशाने या गोष्टी बोलल्या जात असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. "मूळ मुद्दे जातीय जनगणना, भागीदार आणि देशातील संपत्ती कोणाच्या हाती आहे? हे आहेत. या मुद्द्यावर हे लोक चर्चा करत नाहीत. या गोष्टींना घाबरतात ते. त्यापासून दूर पळतात. आम्ही मात्र हे मुद्दे पुढे घेऊन जणार आहोत. गरीबांना त्यांचे हक्क आम्ही मिळवून देऊ. जातीय जनगणा आणि देशातील संपत्ती कोणाच्या हाती आहे हा मोठा प्रश्न आहे. यापासून हे लोक पळ काढतात," असं राहुल गांधी म्हणाले.

ओबीसींचा वाटा किती?

"ओबीसींचा वाटा किती आहे? पंतप्रधान ओबीसी आहेत. मात्र सरकारमधील 90 टक्के कामं अधिकारी करतात. ज्यामध्ये 3 ओबीसी असून त्यांचं ऑफिस एका कोपऱ्यात आहे. सरकारी यंत्रणेमध्ये ओबीसी, दलित आणि आदिवासी लोकांची टक्केवारी किती आहे? हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. मुद्दा कोणाला वाटा किती असल्याचा आहे," असंही राहुल यांनी म्हटलंय.

इतिहास ठाऊक नाही...

राहुल गांधींनी पंडित जवाहरलाल नेहरु यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य देशासाठी खर्च केल्याची आठवण अमित शाहांना करुन दिली. "पंडित जवाहरलाल नेहरुंनी भारतासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. ते अनेक वर्ष तुरुंगात होते. गृहमंत्री अमित शाह यांना कदाचित इतिहास ठाऊक नाही. लक्ष विचलित करण्याच्या हेतूने हे विधान करण्यात आलं आहे,"  असं राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. 

अमित शाह नेमकं काय म्हणाले?

अमित शाहांनी सोमवारी संसदेमध्ये जम्मू-काश्मीरसंदर्भातील विध्येकावरील चर्चेदरम्यान आपलं म्हणणं मांडताना माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका केली. नेहरुंच्या अनेक चुकांमुळे काश्मीरमधील लोकांना मागील 70 वर्षांपासून त्रास सहन करावा लागत आहे. भारतीय लष्कर पाकव्याप्त काश्मीरमधून पाकिस्तानी सैन्याला पळवून लावण्यासाठी फारच सक्षम होती. 2 दिवस अजून मिळाले असते तर आज संपर्ण काश्मीर भारताचा भाग असता. नेहरुंमधे हे असं झालं नाही, अशी टीका शाह यांनी केली होती.