राजस्थानमध्ये अपक्ष किंगमेकरच्या भूमिकेत, काँग्रेस नेते संपर्कात

राजस्थानमध्ये काँग्रेसची धावपळ सुरु

Updated: Dec 11, 2018, 02:21 PM IST
राजस्थानमध्ये अपक्ष किंगमेकरच्या भूमिकेत, काँग्रेस नेते संपर्कात title=

नवी दिल्ली : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरु आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस सध्या 94 जागांवर पुढे आहे. सध्या काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येत असला तरी राजस्थानमध्ये काँग्रेस नेत्यांची पळापळ आणि संपर्क करण्याचं काम सुरु आहे. कारण सर्वाधिक जागा असल्या तरी काँग्रेसकडे बहुमत नाही. बहुमतासाठी 101 जागांची गरज आहे. राजस्थानमध्ये अपक्ष 20 जागेवर पुढे आहेत. त्यामुळे अपक्षांची मदत घेऊन सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचा प्रयत्न असणाप आहे. गोव्या सारखी परिस्थिती होऊ नये म्हणून काँग्रेस प्रयत्न करत आहे.

राज्यात अपक्ष हे किंग मेकरच्या भूमिकेत आहे. बसपा आणि राष्ट्रीय लोक तांत्रिक पक्ष देखील कोणाच्या बाजुने जातो हे देखील महत्त्वाचं असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस नेते सचिन पायलट 8 अपक्ष उमेदवारांच्या सतत संपर्कात आहे. भाजपला देखील 76 जागांवर आघाडीवर आहे. अजूनही कोणाकडेच बहुमत नाही. पण काँग्रेसकडे सत्ता स्थापनेची संधी आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून त्यांना आधी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं जाऊ शकतं. पण गोव्यासारखी स्थिती होऊ नये म्हणून काँग्रेसचे नेते आधीपासूनच कामाला लागले आहे.

राजस्थान विधानसभा निडवणूक एक्झिट पोलमध्येही काँग्रेसच सत्तेत येणार अशी स्पष्ट चिन्हं दिसत होती. राजस्थानमध्ये गहलोत आणि पायलट हे दोघेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. पण सध्या दोन्ही नेते आमदारांशी संपर्क साधण्यात व्यस्त झाले आहेत. काही वेळातच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.