'राज्यात सरकार बनू नये यासाठी भाजपाचे प्रयत्न'

भाजपाचं सरकार बनणार नसेल तर राज्यात कुणाचंही सरकार बनू न देण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे

Updated: Nov 12, 2019, 01:17 PM IST
'राज्यात सरकार बनू नये यासाठी भाजपाचे प्रयत्न' title=

नवी दिल्ली : राज्यात सरकार बनू नये यासाठी भाजपाचे प्रयत्न करत असलाचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय. राज्यात निर्माण झालेला सत्तेचा तिढा केवळ भाजपामुळे निर्माण झालाय, असं वक्तव्य काँग्रेस नेते महेश जोशी यांनी जयपूरमध्ये केलंय. भाजपाचं सरकार बनणार नसेल तर राज्यात कुणाचंही सरकार बनू न देण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे. जर राष्ट्रपती शासन महाराष्ट्रात लागू झालं तरी हे त्यांच्याच फायद्याचं असेल, असंही जोशी यांनी म्हटलंय.  परंतु, जोशी यांच्या या वक्तव्यानंतर भाजपा कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधतंय? हा प्रश्न मागे उरतोच. आपल्या पक्षातील आमदारांसोबत फोडाफोडीचं राजकारण टाळण्यासाठी काँग्रेसने आमदारांना थेट महाराष्ट्राबाहेर, म्हणजेच काँग्रेस प्रशासित राज्यात अर्थात राजस्थानमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलं आहे. 

सत्तास्थापनेवरून काँग्रेस - राष्ट्रवादीत गोंधळ?

सत्तास्थापनेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं समोर येतंय. शरद पवारांनी काँग्रेस नेते अहमद पटेल यांना फोन करून दोन दिवसांची मुदत मागितल्याचा दावा काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंनी केलाय. मात्र, असा कुठलाही फोन राष्ट्रवादीकडून गेला नसल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी 'झी २४ तास'शी बोलताना दिली. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही आपण माणिकराव ठाकरेंना नव्हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीना ओळखतो, असा टोला लगावलाय.

काँग्रेस नेते मुंबईकडे रवाना

दरम्यान, सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसच्या हालचालींना वेग आलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी वेणूगोपाल, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आणि अहमद पटेल मुंबईला येणार आहेत. हे तीनही नेते राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. या बैठकीसंदर्भात सकाळीच सोनिया गांधींनी शरद पवारांशी फोनवरून चर्चा केली आहे. त्यामुळे आज दोन्ही काँग्रेस संयुक्तपणे निर्णय घेणार असल्याची माहिती मल्लिकार्जुन खरगेंनी दिलीय.

शिवसेनेशिवाय शक्य नाही - अजित पवार

शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन शक्य नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. मात्र काँग्रेससोबत चर्चा केल्याशिवाय शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेण्यात येणार नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. शिवसेनेसोबत यापूर्वी कधीही आघाडी केलेली नाही. त्यामुळे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर ही आघाडी होऊ शकते असे संकेतही दिलेत.

काँग्रेसची नवी अट

काँग्रेसनं राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यासाठी नवी अट घातलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री असल्यास काँग्रेस राष्ट्रवादी-शिवसेना सरकारला पाठिंबा देणार असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधीसमोर यासंदर्भात मत व्यक्त केल्याची माहिती 'झी २४ तास'ला सूत्रांनी दिलीय. राष्ट्रवादी काँग्रेसला आज रात्री साडे आठ वाजेपर्यंत संख्याबळ सादर करायचं आहे.