ती एक चूक आणि माल्ल्या कर्जबाजारी झाला

एकेकाळी किंग ऑफ गुड टाईम्स म्हणून स्वत:ला मिरवणारा विजय माल्ल्याची आजची ओळख कर्ज बुडवा अशी झाली आहे. 

Updated: Jun 28, 2018, 05:22 PM IST
ती एक चूक आणि माल्ल्या कर्जबाजारी झाला title=

मुंबई : एकेकाळी किंग ऑफ गुड टाईम्स म्हणून स्वत:ला मिरवणारा विजय माल्ल्याची आजची ओळख कर्ज बुडवा अशी झाली आहे. भारतीय बँकांना ९ हजार कोटी रुपयांचा चुना लावणारा माल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये आहे. मागच्या अडीच वर्षांपासून आपल्याला भारतात यायची इच्छा असल्याचं माल्ल्या म्हणाला आहे. कधी काळी भारतातला प्रसिद्ध व्यावसायिक असलेल्या विजय माल्ल्याची गोष्ट फिल्मी आहे. चित्रपटसृष्टी, क्रीडा जगत आणि कॉर्पोरेट लॉबीमध्ये माल्ल्याचाच बोलबाला होता. पार्टी आणि अय्याशीसाठी माल्ल्या प्रसिद्ध होता. पण एका चुकीमुळे माल्ल्याचा व्यवसाय गडगडला आणि किंग ऑफ गूड टाईम्स म्हणून ओळख असलेला माल्ल्या काही कालावधीतच किंग ऑफ बॅड टाईम्स झाला.

२००७ साली केली मोठी चूक

२००५ साली माल्ल्यानं किंगफिशर एअरलाईन्सची स्थापना केली. किंगफिशरला एक मोठा ब्रॅण्ड बनवण्याचं माल्ल्याचं स्वप्न होतं. त्यामुळे माल्ल्यानं २००७ साली एअर डेक्कन ही विमानसेवा देणारी कंपनी विकत घेतली. यासाठी माल्ल्यानं ३० कोटी डॉलर म्हणजेच १,२०० कोटी रुपये दिले. २००७ साली झालेला हा करार माल्ल्यासाठी सगळ्यात मोठी चूक ठरला. या करारानंतर ५ वर्षांमध्ये माल्ल्याची किंगफिशर एअरलाईन बंद पडली आणि माल्ल्याचं साम्राज्य उद्धवस्त झालं.

दुसरी मोठी विमानसेवा कंपनी

एअर डेक्कन विकत घेतल्यानंतर माल्ल्याला सुरुवातीला फायदा झाला आणि २०११ साली किंगफिशर देशातली दुसरी सगळ्यात मोठी विमानसेवा देणारी कंपनी बनली. पण कंपनीला एअर डेक्कनला विकत घेण्यासाठीच्या लक्ष्याला गाठता आलं नाही. वाढत्या इंधन दरांमुळे कंपनी अडचणीत यायला लागली आणि तोटा व्हायला लागला.

अखेर किंगफिशर बंद

एअर डेक्कन विकत घेण्याबरोबरच माल्ल्यानं आणखी एक चूक केली. माल्ल्यानं एअर डेक्कनसोबत दत्तक घेतलेल्या मुलासारखा व्यवहार केला. एअर डेक्कनचे ग्राहक आता किंगफिशरकडे येतील अशी माल्ल्याची अपेक्षा होती पण एअर डेक्कनच्या ग्राहकांनी किंगफिशरकडे पाठ फिरवली. त्यामुळे ऑक्टोबर २०१२ साली किंगफिशर एअरलाईन बंद पडली. याचा फटका माल्ल्याच्या व्यवसायाला बसला. माल्ल्याचा व्यवसाय आता बंद होण्याच्या मार्गावर आहे.

माल्ल्याची रणनिती अयशस्वी

वर्ष २०१२- किंगफिशर एअरलाईनचे कर्मचारी पगार मिळत नसल्यामुळे संपावर गेले. आयकर विभागानं किंगफिशर एअरलाईनची अकाऊंट्स गोठवली त्यामुळे कंपनीला व्यवसाय करणं कठीण झालं. ऑक्टोबरमध्ये सरकारनं किंगफिशर एअरलाईनचं लायसन्स सस्पेंड केलं. कर्जाची रक्कम कमी करण्यासाठी माल्ल्यानं त्याची दारू कंपनी युनायटेड स्प्रिट्समधली भागीदारी विकण्याचा प्रस्ताव ठेवला. ब्रिटीश कंपनी डियाजियो माल्ल्याच्या कंपनीमधली हिस्सेदारी विकत घ्यायला तयार झाली.

वर्ष २०१३- डियाजियोनं ६,५०० कोटी रुपयांमध्ये युनायटेड स्प्रिट्समधली २७ टक्के हिस्सेदारी विकत घेतली. पण किंगफिशरनं कर्ज देणाऱ्यांचे पैसे परत दिले नाहीत. 

वर्ष २०१४- युनायटेड बँकेनं युनायटेड ब्रेवरीज होल्डिंग्सला कर्ज बुडवणारी कंपनी म्हणून घोषित केलं.

वर्ष २०१५- डियाजियोनं माल्ल्याला युनायटेड स्प्रिट्सचं अध्यक्षपद सोडायला सांगितलं पण माल्ल्यानं याला नकार दिला.

वर्ष २०१६- डियाजियोसोबत झालेल्या सामंजस्यानंतर माल्ल्याला अध्यक्षपद सोडल्यावर ५१५ कोटी रुपये मिळाले. पण बँकांच्या आग्रहामुळे डेट रिकव्हरी ट्रिब्यूनलनं (कर्ज वसुली लवाद) पैसे काढण्यावर बंदी आणली.

माल्याची अशी अवस्था का झाली?

विजय माल्ल्याचे वडिल विठ्ठल माल्ल्यांचा दारूचा व्यवसाय होता. पण विजय माल्ल्यानं देशातल्या प्रसिद्ध  मॅनेजमेंट संस्थांमधल्या लोकांची निवड करून दारू व्यवसायाला कॉर्पोरेट रूप दिलं. कसलाही विचार न करता आणि अकाऊंट बॅलन्स न बघता नवीन कंपन्या झटक्यात विकत घेण्याच्या निर्णयामुळे माल्ल्याची ही अवस्था झाली आहे. दुसऱ्या विमान कंपन्या विचारही करू शकत नाही, अशा सुविधा माल्ल्यानं किंगफिशर एअरलाईन्समध्ये दिल्या होत्या.

नफ्यावर मोठा परिणाम

प्रवाशांना सुविधा म्हणून माल्ल्यानं परदेशी पत्र-पत्रिका मागवल्या. पण या पत्रिका गोदामाबाहेर कधीच आल्या नाहीत. याचा कंपनीच्या नफ्यावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे माल्ल्याला वारंवार कर्ज घ्यावं लागलं. कर्जाचा बोजा वाढल्यामुळे माल्ल्याला हे कर्ज फेडता आलं नाही. आणि अखेर माल्ल्या देश सोडून पळून गेला.