नवी दिल्ली: ‘दिवाण हाऊसिंग फायनान्स लि. (डीएचएफएल)’ या बिगर बँकिंग संस्थेने (एनबीएफसी) ३१ हजार कोटी रूपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे खळबळजनक वृत्त 'कोब्रापोस्ट' या वेब पोर्टलने दिले आहे. 'डीएचएफएल'च्या प्रवर्तकांनी बनावट कंपन्यांना दिलेल्या कर्जाच्या माध्यमातून हा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. बनावट कंपन्यांना दिलेले पैसे प्रवर्तकांनी परस्पर हडपले. या पैशातून त्यांनी परदेशात मोठ्याप्रमाणावर मालमत्ता खरेदी केल्याचेही 'कोब्रापोस्ट'ने म्हटले आहे. या माध्यमातून जवळपास ३१ हजार कोटींची अफरातफर झाल्याचा अंदाज आहे. या वृत्तानंतर भांडवली बाजारात डीएचएफएलचे समभाग जवळपास ८ टक्क्यांनी कोसळले. गेल्या काही महिन्यांपासून रिझर्व्ह बँकेने बिगर बँकिंग संस्थांसाठीचे नियम अधिक कठोर केले आहेत. जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहारांना आळा बसावा. मात्र, हे निर्बंध शिथील करण्यासाठी रिझर्व्ह बँकेवर सातत्याने दबाव आणला जात आहे.
'कोब्रा पोस्ट'च्या वृत्तानुसार, सुरुवातीला बनावट कंपन्यांची समूहांमध्ये विभागणी करण्यात आली. यापैकी अनेक कंपन्यांची कार्यालये एकाच पत्त्यावर होती. इतकेच नव्हे तर बहुतांश कंपन्यांचे संचालक मंडळही सारखेच होते. हा गैरव्यवहार दडपण्यासाठी संबंधित कंपन्यांचे लेखापरीक्षणही (ऑडिट) विशिष्ट लेखापरीक्षकांकडूनच करून घेण्यात आले होते. यानंतर बनावट कंपन्यांना कर्ज म्हणून देण्यात आलेली रक्कम प्रवर्तकांनी स्वत:कडे वळवली. या पैशातून त्यांनी दुबई, इंग्लंड, मॉरिशिअस आणि श्रीलंकेत मालमत्ता खरेदी केल्याचे समजते. कपिल वाधवान, अरूणा वाधवान आणि धीरज वाधवान हे डीएचएफएलचे प्रवर्तक आहेत.
सध्याच्या घडीला डीएचएफएलचे भांडवली बाजारातील मूल्य ८,७९५ कोटीच्या आसपास आहे. मात्र, तरीही कंपनीकडून ९६ हजार कोटींची कर्जे वितरीत करण्यात आली होती. या वित्तपुरवठ्यासाठी लागणारे ३७ हजार कोटी बँकांकडून घेण्यात आले होते. स्टेट बँकेने 'डीएचएफएल'ला सर्वाधिक ११,५०० कोटींचे कर्ज दिले आहे. तर बँक ऑफ बडोदाने 'डीएचएफएल'ला पाच हजार कोटींचे कर्ज दिले आहे.