CM ममता बॅनर्जी येथून लढवणार निवडणूक, ममतांसाठी या आमदाराने दिला राजीनामा

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना 6 महिन्याच्या आत विधानसभेचे सदस्य व्हावे लागणार आहे.

Updated: May 21, 2021, 08:41 PM IST
CM ममता बॅनर्जी येथून लढवणार निवडणूक, ममतांसाठी या आमदाराने दिला राजीनामा title=

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते सोवनदेब चट्टोपाध्याय (Sovandeb Chattopadhyay) यांनी आमदारपदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिकामी झाली. राजीनामा दिल्यानंतर सोवनदेब चट्टोपाध्याय यांनी पुष्टी केली की ममता बॅनर्जी या भवानीपूरमधून निवडणूक लढवतील.

विधानसभेची ही जागा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची पारंपारिक जागा होती, परंतु विधानसभा निवडणुकीत सुवेंदु अधिकारी यांच्या विरोधात नंदीग्रामची जागा लढविण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही जागा सोडली होती. यानंतर या जागेवरुन पक्षाने सोवनदेब चट्टोपाध्याय यांना उमेदवारी दिली होती. परंतु, नंदीग्रामध्ये सुवेंदु अधिकारी यांच्याककडून 1953 मतांनी पराभव झाल्यानंतर ममता यांना पुन्हा विधानसभेवर पोहोचण्यासाठी पोटनिवडणूक जिंकावी लागणार आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम जागेवर पराभूत झालेल्या बॅनर्जी यांना मुख्यमंत्रीपदावर राहण्यासाठी 6 महिन्यांच्या आत विधानसभेचे सदस्यत्व घ्यावे लागेल.

आपल्या राजीनाम्याबाबत चट्टोपाध्याय म्हणाले की, हा पक्षाचा निर्णय आहे आणि ते हा पाळतील. कृषीमंत्री चट्टोपाध्याय म्हणाले की, 'मी आज भवानीपूर सीटवरून आमदार म्हणून राजीनामा देणार आहे. हा माझा आणि पक्षाचा निर्णय आहे. मी आनंदाने त्याचे अनुसरण करीत आहे.

चट्टोपाध्याय या जागेवरुन लढणार

सूत्रांनी सांगितले की 70 वर्षीय चट्टोपाध्याय खरदाह मतदारसंघातून आपले नशीब आजमावू शकतात, जिथे पक्षाचे आमदार काजल सिन्हा यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होणार आहे.