Team Devendra Fadnavis: विधानसभेचे निकाल लागल्यावर मुख्यमंत्री ठरायला आणि शपथविधीला 12 दिवस लागले. मात्र यानंतर चर्चा सुरु झालीय ती, मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार आणि कोणत्या खात्याची लॉटरी कुणाला लागणार याची. पण या लॉटरीची तिकीटं आहेत स्वत: मुख्यमंत्री फडणवीसांच्या हातात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतल्यापासून त्यांच्या मंत्रिमंडळात कोण मंत्री असणार याची उत्सुकता निर्माण झालीय. टीम फडणवीस जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिल्याचं सांगण्यात येतंय. पुढच्या 96 तासांत टीम फडणवीस शपथ घेण्याची शक्यता आहे. फडणवीस त्यांच्या मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांचा समावेश कऱणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय. गेल्या पाच वर्षांत ज्या आमदारांची सार्वजनिक जिवनात कामगिरी सरस राहिलीये अशा आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. काही ज्येष्ठ नेत्यांना संघटनेत परत पाठवलं जाण्याची शक्यता आहे. फडणवीस सर्व विचार करुन मंत्रिमंडळ सदस्यांची नियुक्ती करतील असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पुढच्या काही दिवसांत पालकमंत्रिपदाचाही निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रजासत्ताकदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं. त्यामुळं पालकमंत्रिपदाचा फैसलाही लवकरात लवकर होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय.
फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर प्रशासनासाठी शंभर दिवसांचा रोडमॅप तयार केलाय. मंत्रिमंडळातही फडणवीसांच्या विश्वासातली आणि पसंतीची टीम असणार आहे. त्यामुळं फडणवीसांची ही पाच वर्षांची इनिंग धडाकेबाज निर्णयांची असणार याबाबत शंका नाही.
महायुती सरकारतचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी शपथ घेतली. साधारण शपथ घेतल्यानंतर पुढच्या तासादोनतासांत मंत्र्यांकडं खाती दिली जातात. पण 24 तास उलटल्यानंतरही मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालेलं नाही. सध्या सगळी खाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडंच आहेत. सरकार एका पक्षाचं नाही त्यामुळं खातेवाटपात उशीर होत असल्याचा दावा राष्ट्रवादीनं केलाय.शिवसेनेनं सन्मानजनक खाती मिळावीत अशी मागणी केलीय.मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रक्रियेत आपण नसल्याचं सांगत मला कळलं की तुम्हाला कळवतो असं मोघम उत्तर चंद्रकांत पाटलांनी दिलंय.सुरुवातीला शपथ घेतलेल्या तिघांमध्ये खातेवाटप होईल अशी अपेक्षा होती. पण खातेवाटप जाहीर झालेलं नसल्यानं खात्यांची रस्सीखेच अजूनही सुरु असल्याची चर्चा सुरु झालीय.
महायुतीत राष्ट्रवादी आणि भाजप हे सख्खे दोस्त आहेत. पण पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा विषय निघताच भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोस्तीत कुस्ती सुरु झालीय. गेल्यावेळी अजित पवार सरकारमध्ये सामील होताच त्यांनी पुण्याचं पालकमंत्रिपद स्वतःकडं घेतलं. तर चंद्रकांतदादांना पालकमंत्रिपदावर पाणी सोडावं लागलं होतं. आता यावेळी मात्र पुण्याचं पालकमंत्रिपद भाजपलाच हवं असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. पालकमंत्रिपदावर चंद्रकांत पाटलांनी थेट दावा केला नसला तरी पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारु असं अप्रत्यक्षपणं सांगितलं.राष्ट्रवादी मात्र पुण्याच्या पालकमंत्रिपदावरुन दावा सोडायला तयार नाही. पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडंच असावं अशी थेट भूमिका राष्ट्रवादीनं घेतलीय.मागच्यावेळी पालकमंत्रिपदाची अजितदादांची इच्छा भाजपनं पूर्ण केलीय. यावेळी भाजप आपल्या पक्षातील दादांची ईच्छा पूर्ण करतील का याबाबत उत्सुकता निर्माण झालीय. सध्या फडणवीस आणि अजितदादांची मैत्री पाहता ही शक्यता कमीच वाटू लागल्याची चर्चा सुरु झालीय.