Climate Change Sea Level: जगभरातील कित्येक देशांना तापमानवाढीचा फटका बसत आहे. तापमान वाढीमुळं अवकाळी पाऊस, उष्णतेच्या लाटा यासारख्या नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. जागतिक तापमानवाढ ही समस्या येत्या काही काळांत इतकी तीव्र होणार आहे की त्याचा फटका समुद्र किनाऱ्यांवरील देशांना बसणार आहे. कारण जगभरातील समुद्राच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळं काही देशांना जलसमाधी मिळणार असल्याचे भाकित वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं देशातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हवामान बदलामुळं बर्फ वितळत असून त्यामुळं समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. ही प्रक्रिया गेल्या काही दशकांत आणखी वेगाने होण्याची शक्यता आहे. जसं जसं तापमान वाढेल तसे समुद्रातील पाण्याच्या तापमानातही वाढ होऊ शकते. या तापमानवाढीचा थेट परिणाम किनारपट्टीवरील देश आणि बेटांवर पडणार आहे.
जगभरातील देशातील समुद्राच्या वाढत्या जलस्तरावरामुळं सर्वाधिक धोका यातील काही प्रमुख देशांना आहे. मालदीव, तुवालु, किरिबाती आणि मार्शल बेट हे सामील आहेत. या देशांतील सर्वाधिक लोकसंख्या समुद्रसपाटीपासून काही मीटर उंचीवरच राहते. त्या व्यतिरिक्त बांग्लादेश आणि मालदीवसारख्या देशांचीही परिस्थिती वाईट आहे.
बांग्लादेशच्या काही किनारपट्टीवरील क्षेत्रात येणाऱ्या पूरस्थितीमुळं ही समस्या आणखी अधोरेखीत झाली आहे. जुलै 2023 मध्ये आलेल्या पूरामध्ये अनेक गाव पाण्याखाली गेले होते तर लाखो लोकांना याचा फटका बसला होता. बांगलादेशच्या जलसंपदा मंत्र्यांनी इशारा दिला होता की, जागतिक तापमान वाढ नियंत्रित न केल्यास बांगलादेशातील बहुतेक किनारी भाग येत्या काही वर्षांत पाण्याखाली जाऊ शकतात.
मालदीवमध्येही समुद्राची वाढती पाणी पातळी ही गंभीर समस्या आहे. मालदीव सरकारने 2023 मध्ये वाढत्या समुद्र पातळीपासून पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यासाठी एक योजना सुरू केली आहे, परंतु या प्रयत्ना नंतरही लोकांना त्यांची बेटे सुरक्षित राहतील की नाही याबद्दल काळजी वाटते. समुद्राच्या वाढत्या पातळीचा परिणाम केवळ बांगलादेश आणि मालदीवपुरता मर्यादित नसून संपूर्ण मानवतेसाठी धोका आहे. मुंबई, न्यूयॉर्क, शांघाय यासारख्या जगातील इतर अनेक किनारी शहरांनाही ही समस्या भेडसावू शकते. त्यामुळं हवामान बदलावर नियंत्रण न ठेवल्यास लाखो लोकांना याचा फटका बसू शकतो.