जगातलं सातवं आश्चर्य असलेल्या 'ताजमहाल'मध्ये पसरली दुर्गंधी

'परिसरातील अस्वच्छता पाहून हे पर्यटक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानाबद्दल काय विचार करतील?'

Updated: Jun 29, 2019, 11:51 AM IST
जगातलं सातवं आश्चर्य असलेल्या 'ताजमहाल'मध्ये पसरली दुर्गंधी title=

आग्रा : जगातलं सातवं आश्चर्य म्हणून ओळखलं जाणारं 'ताजमहाल'मध्ये सध्या दुर्गंधी पसरलीय. त्याचं कारण म्हणजे इथल्या सफाई कर्मचाऱ्यांचं आंदोलन... सफाई कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानं ताजमहाल परिसरात कचरा-घाण पसरलीय. वेळेवर वेतन न मिळाल्यानं इथल्या सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय. 'ताजमहालसारख्या जगात प्रसिद्ध असणाऱ्या स्मारकाचे सफाई कर्मचारी आंदोलन करत असतील तर हा चिंतेचा विषय आहे. आग्र्याच्या या प्रसिद्ध ठिकाणी हजारोंच्या संख्येनं देश-विदेशातील पर्यटक दररोज भेट देत असतात. अशावेळी या परिसरातील अस्वच्छता पाहून हे पर्यटक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानाबद्दल काय विचार करतील?' असं टुरिस्ट गाईड वेद गौतम यांनी म्हटलंय. 

ताजमहल प्रत्येक आठवड्यात शुक्रवारी बंद असतं. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणद्वारे आउटसोर्स करण्यात आलेल्या भारतीय विकास ग्रुपच्या २८ कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेलं नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी बुधवारी आणि गुरुवारी संप सुरू केलाय. गेल्या तीन महिन्यांपासून वेगवेगळ्या पद्धतीनं आपण आपल्या मागण्या मांडण्याचा आणि आपल्या हक्काचा पगार मिळण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. 

दुसरीकडे, ताजमहाल परिसरात अस्वच्छता असल्यानं आग्रा पर्यटन क्षेत्रातील लोक चिंतेत आहेत. आपण स्वच्छतेसारख्या मुलभूत सेवेचीही व्यवस्था करू शकत नाहीत, अशी उद्विग्न प्रतिक्रिया पर्यटन उद्योगाचे नेते सुरेंद्र शर्मा यांनी दिलीय.