'आम्ही दर 5 वर्षांनी जनतेकडे मतं मागायला...'; सरकारी कामांमधील न्यायालयीन हस्तक्षेपासंदर्भात चंद्रचूड यांचं वक्तव्य

CJI Chandrachud On Court Interference In Government Work: एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायालयाच्या राजकीय हस्तक्षेपासंदर्भात भाष्य केलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 25, 2023, 09:27 AM IST
'आम्ही दर 5 वर्षांनी जनतेकडे मतं मागायला...'; सरकारी कामांमधील न्यायालयीन हस्तक्षेपासंदर्भात चंद्रचूड यांचं वक्तव्य title=
एका जाहीर कार्यक्रमात बोलताना चंद्रचूड यांचं विधान

CJI Chandrachud On Court Interference In Government Work: सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी न्यायव्यवस्थेसंदर्भात आपलं एक निरिक्षण नोंदवलं असू सध्या त्यांचं हे विधान चर्चेत आहे. जरी जनता न्यायाधिशांची निवड करत नसली तरी त्यांची भूमिका महत्त्वाची असते. न्यायाव्यवस्था ही प्रगतशील सामजाच्या निर्मितीमध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावते, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. सरन्यायाधीश वॉशिंग्टनमधील जॉर्ज टाऊन यूनिव्हर्सिटी लॉ सेंटर आणि दिल्लीतील सोसायटी फॉर डेमोक्रेटिक राइट्सने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये बोलत होते.

आम्ही जनतेमधून निवडून येत नाही पण...

न्यायव्यवस्थेकडून राजकीय हस्तक्षेप होत असल्याच्या मुद्द्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भाष्य केलं. जरी जनता न्यायाधिशांची निवड करत नसली तरी त्यांची भूमिका फार महत्त्वाची असते. आम्ही दर 5 वर्षांनी जनतेकडे मत मागण्यासाठी जात नाही. मात्र याचं एक खास कारण आहे. माझ्या मते न्यायव्यवस्था ही समाज घडवण्यासाठी एक कायम स्वरुपी प्रभाव पाडत असते. खास करुन अशा वेळी हा प्रभाव महत्त्वाचा ठरतो जेव्हा तंत्रज्ञान फार वेगाने बदलत आहे, असं सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.

केवळ निकालांसाठी लोक न्यायालयांमध्ये येत नाहीत तर...

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी लोक केवळ निकालांसाठी न्यायालयामध्ये येत नाही. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं असल्याचंही सरन्यायाधीशांनी म्हटलं. संविधानात्मक बदल घडावा या हेतूनही अनेकजण न्यायालयाचा दरात येतात. ही गोष्ट न्यायालयांसाठी फार महत्त्वाची आहे, असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. न्यायालयं सुद्धा इतर सरकारी संस्थांसारखीच काम करता. या सर्वांमध्ये वेगवेगळे हक्क वाटून देण्यात आले आहेत. आम्ही राजकीय कामकाजामध्ये हस्तक्षेप करत नाही किंवा कार्यपालिकेच्या कामाकाजामध्येही हस्तक्षेप करत नाही, असंही सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले. 

निकालांचा परिणाम आणि प्रक्रियाही महत्त्वाची

याच कार्यक्रमामध्ये सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयातील बहुमतासंदर्भातही भाष्य केलं. एखादा समाज स्थिर आहे की नाही हे न्यायालयीन माध्यमांना न्यायाधिशांना योग्य पद्धतीने हाताळता येतं की नाही यावर अवलंबून असतं. जगभरातील अनेक समाजांमध्ये कायद्याने हिंसेची जागा घेतली आहे. "अनेक प्रकरणांमध्ये आम्ही निर्णय घेतो. ज्यामध्ये आताच्या समलैंगिक विवाहच्या प्रकरणाचाही समावेश आहे. माझ्यामते निकालांचा परिणाम अधिक महत्त्वाचा असतो मात्र प्रक्रिया सुद्धा परिणामांइतकीच महत्त्वाची असते," असं सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले. समलैंगिक विवाहावरील निकाल हा विवेकबुद्धीवर आधारित निकाल असून ते संविधानाचे मत आहे असं चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

व्यापक समानता हा उद्देश

न्यायालयांचा उद्देश हा व्यापक समानता मिळवण्याचा असून हे समानतेच्या अधिकारांविरोधात नाही, असंही सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.