CJI Chandrachud On CBI: केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये देशातील न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर असलेले सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केंद्रीय यंत्रणांना खडेबोल सुनावले आहेत. 20 व्या डी. पी. कोहली स्मृती व्याख्यानमालेतील आपल्या भाषणामध्ये न्या. चंद्रचूड यांनी आपलं रोखठोक मत व्यक्त केलं. केंद्रीय तपास यंत्रणांची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळेच या यंत्रणांनी आता आर्थकि गैरव्यवहार आणि देशविरोधी कायरवायांचा समावेश असलेल्या प्रकरणांकडे सर्वात जास्त लक्ष द्यायला हवं, असं चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.
माझ्या मते मागील काही वर्षांमध्ये आपण आपल्या केंद्रीय यंत्रणांना अनेक जागी गुंतवून ठेवलं आहे, असं चंद्रचूड यांनी आपल्या भाषणात म्हटलं. "सध्याच्या घडीला देशातील प्रमुख तपास यंत्रणांनी केवळ अशा प्रकरणांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे ज्यांच्यामुळे खरोखरच राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो किंवा देशाविरुद्ध आर्थिक गुन्हेगारी स्वरुपाची ही प्रकरण असतात," अशी अपेक्षा न्या. चंद्रचूड यांनी व्यक्त केली. "सीबीआयला भ्रष्टाचारविरोधी तपास यंत्रणा या मूळ भूमिकेच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारी प्रकरणांचा तपास सोपवला जात आहे. या प्रकरणांचा तपास सीबीआयला करायला सांगितलं जात आहे. यामुळे सीबीआयवरही आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याची मोठी जबाबदारी आहे. यंत्रणांच्या मर्यादित व्याप्तीमुळे प्रमुख तपास यंत्रणांनी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रकरणांवरच लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे," असा सल्ला चंद्रचूड यांनी दिला.
तसेच पुढे बोलताना चंद्रचूड यांनी प्रत्येक प्रकरण सीबीआयकडे सोपवणं अयोग्य असल्याचंही म्हटलं. राष्ट्राविरुद्ध आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित बाबांवर सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असंही चंद्रचूड म्हणाले. भ्रष्टाचारासारख्या प्रकरणांविरोधात प्रामुख्याने कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणेकडे वेगवेगळ्या प्रकरणाची गुन्हेगारी प्रकरण सोपवली जात असल्याबद्दल चंद्रचूड यांनी नाराजीचा स्वर लगावला.
नक्की वाचा >> CJI चंद्रचूड यांच्या आदेशामुळे भुजबळ अडचणीत? 850 कोटींच्या घोटाळ्यातील क्लीन चीट रद्द होणार?
आधुनिक जगातील आव्हाने आणि वाढती गुन्हेगारी यासंदर्भातही चंद्रचूड यांनी भाष्य केलं. तंत्रज्ञानामुळे गुन्ह्यांचे प्रकार बदलले आहेत याकडे लक्ष वेधत चंद्रचूड यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्यांमुळे न्याय यंत्रणेसमोर मोठं आवाहन निर्माण झाल्याचं म्हटलं. तंत्रज्ञानावर आधारित गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळेच या बदललेल्या ट्रेंडने तपास यंत्रणांबरोबरच न्याय यंत्रणांसमोर मोठं आव्हान उभं केलं असल्याचं प्रांजळ मत चंद्रचूड यांनी व्यक्त केलं.
CHIEF JUSTICE OF INDIA DELIVERS THE 20TH D. P. KOHLI MEMORIAL LECTURE ON THE THEME “ADOPTING TECHNOLOGY TO ADVANCE CRIMINAL JUSTICE”
ALSO PRESENTS MEDALS TO 35 CBI OFFICERS & OFFICIALS FOR DISTINGUISHED & MERITORIOUS SERVICE pic.twitter.com/pW7k7WoKgB— Central Bureau of Investigation (India) (@CBIHeadquarters) April 1, 2024
सध्याच्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होणाऱ्या युगात एखाद्याची खासगी माहिती चोरीला गेल्यास त्याचा माग काढणं कठीण झालं आहे. तसेच सायबर गुन्ह्यांसाठी ज्या गुंतागुंतीच्या पद्धती गुन्हेगार वापरतात त्यामुळे तपास यंत्रणांना तपासात अडचण निर्माण होते, असं चंद्रचूड म्हणाले.