केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) त्यांच्या कार्यशैलीसाठी ओळखले जातात. ते देशातील प्रदूषणाच्या मुद्द्यासंदर्भातही गांभीर्याने काम करत असून त्यांनी या योजना अनेकदा आपल्या भाषणांमध्ये बोलून दाखवल्या आहेत. प्रदुषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्यांच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा गडकरींचा प्रयत्न आहे. मात्र एकीकडे इलेक्ट्रीक गाड्यांना प्रोत्साहन देत असतानाच दुसरीकडे गडकरींनी आज एक मोठी घोषणा केली. श्रीलंका आणि बंगलादेशने भारतामधून इथेनॉल आयात करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं म्हटलं आहे असं गडकरींनी सांगितलं. केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमंत्री असलेल्या गडकरींनी या दोन्ही देशांबरोबर (श्रीलंका आणि बांगलादेश) सरकारी स्तरावर इथेनॉलच्या व्यवहाराबद्दल चर्चा सुरु असल्याची माहिती दिली.
गडकरींनी जैव-इंधनासंदर्भात भारतीय उद्योग महासंघाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या 'बायो एनर्जी समिट 2023'च्या (CII Bio Energy Summit 2023) कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना या विषयाबद्दलची माहिती दिली. "मी बंगलादेशच्या पंतप्रधान आणि श्रीलंकेच्या मंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा केली. बंगलादेश आणि श्रीलंका हे दोन्ही देश इथेनॉल मिश्रीत पेट्रोलचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असून या मोहिमेअंतर्गत ते भारतामधून इथेनॉल आयात करण्यासाठी फार उत्सुक आहेत," असं गडकरी म्हणाले. त्याचप्रमाणे गडकरींनी भारतीय वाहनचालकांसाठीही एक आनंदाची बातमी दिली आहे. पुढील १५ दिवसांमध्ये आपण केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींबरोबर बैठक घेणार असून या बैठकीत इथेनॉल पंप सुरु करण्यासाठी धोरण तयार करण्यावर चर्चा केली जाणार आहे, असं गडकरी म्हणाले.
जैव-इंधनाच्या वापरला प्रोत्साहन देणाऱ्या गडकरींनी इथेनॉल वापराचं (Ethanol Blended Petrol) भविष्य फारच आश्वासक असल्याचं म्हटलं आहे. देशामध्ये इथेनॉल मिश्रीत इंधनाची विक्री सुरु झाल्यास इंधनाचे दर कमी होतील. याचा सर्वाधिक फायदा खासगी वाहनचालकांना आणि दुचाकीस्वारांना होणार आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉलचा वापर केल्याने प्रदूषणही कमी प्रमाणात होईल. सरकार जास्तीत जास्त इथेनॉल विकत घेण्याच्या तयारीत आहे. पर्यायी इंधन म्हणून केंद्र सरकार फार आश्वासकपणे इथेनॉलकडे पाहत असून त्याच्या वापराला प्रोत्साहन दिलं जाणार असल्याचंही गडकरी म्हणाले.
Addressing CII's 11th edition of Bio-Energy Summit 2023 https://t.co/nm7NbwfHFe
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 12, 2023
गडकरींनी ग्रीन फ्लूएलच्या (हरित इंधनाच्या) वापराने प्रदूषणाची समस्येवरही तोडगा काढता येईल असा विश्वास व्यक्त केला. वाहनांमुळे होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक हायवेसारख्या प्रकल्पांबरोबर इलेक्ट्रॉनिक वाहनांना सबसीडी देण्याचं धोरण केंद्र सरकारने अवलंबलं आहे. त्यातच आता इथेनॉलचा वापर करण्यास सुरुवात केल्यास उपलब्ध यंत्रणेच्या माध्यमातूनच प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करता येतील आणि त्या माध्यमातून इंधनाचा सर्वसमान्यांवर पडणार भारही हलका होईल.