बिहारमध्ये चिराग पासवानांकडून पीएम मोदींचं स्वागत, नितीशकुमारांवर मात्र टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मिशन बिहार..

Updated: Oct 23, 2020, 11:29 AM IST
बिहारमध्ये चिराग पासवानांकडून पीएम मोदींचं स्वागत, नितीशकुमारांवर मात्र टीका title=

पटना : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून मिशन बिहारवर उतरणार आहेत. पंतप्रधान मोदी आज बिहारच्या निवडणूकीसाठी 3 सभांना संबोधित करणार आहेत. याआधी लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी बिहारमध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यासह चिराग यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीका ही केली आहे.

आज नितीशकुमार यांची प्रतीक्षा संपेल, असे एलजेपी अध्यक्ष चिराग पासवान यांनी म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानानंतरही नितीशकुमार हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तळमळ करीत आहेत. अमित शहा आधीपासूनच म्हणाले आहेत की एलजेपी एनडीएचा भाग नाही. नितीशकुमार यांनी 5 वर्षात काय केले ते सांगावे.'

नितीशकुमार यांना लक्ष्य करत चिराग पासवान म्हणाले की, नितीशकुमार यांची कामगिरी स्वत:ची नाही. आपले राजकीय गुरू लालू प्रसाद यादव यांच्या नावाची भीती दर्शवित त्यांना मते मिळवायची आहेत. महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एनडीएच्या समर्थनार्थ बिहारच्या जनतेला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदींचा सासाराममधील पहिली सभा आज होत आहे.

दुपारी बाराच्या सुमारास गया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची दुसरी सभा आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास भागलपूरमध्ये पंतप्रधान मोदींची तिसरी आणि शेवटची सभा आहे. पहिल्या आणि तिसर्‍या सभेत मुख्यमंत्री नितीशकुमारही उपस्थित असतील, तर माजी मुख्यमंत्री सीएम जीतनराम मांझी दुसर्‍या रॅलीत उपस्थित असतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा बिहारच्या घराघरात पोहोचवण्यासाठी भाजपच्या आयटी टीमने एक विशेष आराखडा तयार केला आहे. मोदी एकाच ठिकाणी भाषण करतील आणि 15 विधानसभा मतदारसंघात 100 ठिकाणी एलईडीद्वारे याचं प्रक्षेपण होणार आहे. संपूर्ण आराखडा अशा  प्रकारे तयार करण्यात आला आहे की, प्रत्येक रॅलीत सुमारे 1 लाख लोकांना सहभागी होता येईल.