नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सीमा भागाचा दौरा केल्यामुळे चीनचा जळफळाट झाला आहे. सीमेवर परिस्थिती जटिल होईल, अशी पावलं कोणी उचलू नयेत, अशी प्रतिक्रिया चीनकडून देण्यात आली आहे. 'चीन आणि भारताचं सैन्य आणि राजकीय प्रतिनिधी एकमेकांच्या संपर्कात आहेत. सीमेवर परिस्थिती जटिल होईल, अशी पावलं कोणीच उचलू नयेत', अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी दिली आहे.
चीनी कंपन्यांच्या मालाला भारतात सीमा शूल्क मंजुरीसाठी लागणारा वेळ आणि चीनच्या कंपन्यांना भारतातल्या हायवे प्रोजेक्ट्समध्ये सामील करण्यापासून रोखण्याच्या भारताच्या निर्णयावरही झाओ यांनी प्रतिक्रिया दिली. व्यवसायाच्या वैध अधिकारानुसार योग्य ती पावलं उचलली जातील, असं झाओ म्हणाले.
'भारताने चीनवर चुकीच्या पद्धतीने अनुमान लावू नयेत. भारत द्विपक्षीय संबंध टिकवण्यासाठी चीनसोबत मिळून काम करेल, अशी आमची अपेक्षा आहे,' असं वक्तव्य झाओ यांनी केलं.
दिल्लीमध्ये असलेल्या चीनच्या दूतावासांचे प्रवक्ते जी रोंग यांनीही ट्विट करून चीनची भूमिका मांडली आहे. 'चीनला विस्तारवादी म्हणून पाहणं तथ्यहिन आहे. चीनने आपल्या १४ पैकी १२ शेजाऱ्यांसोबत शांततेच्या मार्गाने सीमांकन केलं आहे,' असं ट्विट जी रोंग यांनी केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लेह दौऱ्यात लष्कर, वायूसेना आणि आयटीबीपीच्या जवानांसोबत बातचित केली. मोदींसोबत माजी लष्कर प्रमुख आणि सध्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाप जनरल बिपीन रावत आणि सध्याचे लष्कर प्रमुख एम.एम.नरवणेही होते.
'विस्तारवादाचं युग संपून गेला आहे. शत्रूंनी भारताच्या सशस्त्र सेनेचा कोप आणि क्रोध बघितला आहे,' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी लेह दौऱ्यामध्ये म्हणाले.
भारत आणि चीनच्या लष्करामध्ये पूर्व लडाखच्या अनेक ठिकाणी मागच्या ७ आठवड्यांमध्ये तणाव वाढला आहे. १५ जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीमध्ये भारताचे २० जवान शहीद झाले, यानंतर हा तणाव आणखीन वाढला. दुसरीकडे चीनच्या जवानांना भारतीय लष्कराने जशास तसे प्रत्युत्तर दिलं, पण चीनकडून झालेल्या नुकसानीची माहिती देण्यात आली नाही.