मंदिरात न जाणारे रामभक्त; यांच्यासाठी त्यांचे शरीरच राम मंदिर; कोण आहेत रामनामी?

Ramnami Samaj tribal traditions : तुम्हाला मंदिरात न जाणारे रामभक्त माहितीये का? यांच्यासाठी त्यांचे शरीरच राम मंदिर... होय सध्या चर्चेत असलेले रामनामी कोण आहेत? जाणून घ्या!

Updated: Jan 19, 2024, 07:38 PM IST
मंदिरात न जाणारे रामभक्त; यांच्यासाठी त्यांचे शरीरच राम मंदिर; कोण आहेत रामनामी? title=
Chhattisgarh Ramnami Samaj

Chhattisgarh Ramnami Samaj : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा (Ram Lalla Pran Pratishtha) केली जाणार आहे. हा सोहळा देशातील बहुतांश भागात उत्साहात साजरा केला जाणार आहे. अशातच आता देशभरात जल्लोषाचं वातावरण पहायला मिळतंय. अशातच आता अयोध्येला येऊन रामाचं दर्शन घेण्यासाठी देशातील अनेक नागरिक उत्सुक आहेत. मात्र, तुम्हाला मंदिरात न जाणारे रामभक्त माहितीये का? यांच्यासाठी त्यांचे शरीरच राम मंदिर... होय सध्या चर्चेत असलेले रामनामी कोण आहेत? तुम्हाला माहिती का?

कोण आहेत रामनामी?

छत्तीसगड इथल्या रामनामी समुदायाची आगळी-वेगळी ख्याती देशभर आहे. हा समुदाय आपल्या सर्वांगावर रामनाम गोंदवून घेतो. ज्या व्यक्ती आपल्या माथ्यावर रामाचे नाव गोंदवून घेतात त्यांना सर्वांगी रामनाम म्हणतात. एवढंच नाही तर काहीजण संपूर्ण शरिरावर रामाचं नाव गोंदवून घेतात. ज्या व्यक्ती संपूर्ण शरीरावर रामाचे नाव गोंदवून घेतात त्यांना नखशिख असं म्हणतात. विशेष म्हणजे हा समाज कधीच कोणत्याच मंदिरात जात नाहीत किंवा कोणत्या मूर्तीची पूजा करत नाहीत. जन्मापासून या समाजात रामाचं बाळकडू पाजलं जातं. 

समाजाचा वारसा पुढे जावा यासाठी समुदायातील बाळ जेव्हा 2 वर्षाचं होतं तेव्हा त्याच्या छातीवर राम नाव गोंदवलं जातं. संपूर्ण शरीरावर रामाचे नाव, राम नावाची शाल, मोरपंखाची पगडी आणि घुंगरू असा पेहराव या समाजातील लोकांचा असल्याचं पहायला मिळतं. या जमातीमधील लोकांनी 1890 च्या दशकात आपल्या शरीरावर रामाचं नाव लिहायला सुरुवात केली होती. रामनामी जमातीच्या स्थापनेचं श्रेय परशूराम यांना जातं. रामनामी जमातीचे लोक श्रीरामावर अतूट श्रद्धा ठेवतात. भारतामध्ये रामनामी जमातीचे सुमारे एक लाख लोक आहेत. छत्तीसगडमधील महानदीच्या किनाऱ्यावर या समुदायाचे लोक पहायला मिळतात. देशात अनेक ठिकाणी देखील या समाजातील लोकांच्या नोंदी सापडल्या आहेत.

परशुराम यांनी त्यांच्या जमातीमध्ये रामनाम लिहिण्यास सुरुवात केली होती, अशा समाजाकडून सांगण्यात येतं. एकदा त्यांना मंदिरात जाण्यापासून अडवण्यात आलं. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाल्याचं वृद्ध व्यक्ती सांगतात. मुघलांनी ज्यावेळी यांच्यावर आत्याचार केले. तेव्हा संपूर्ण शरिरावर राम लिहिण्यास यांनी सुरूवात केली होती. कालांतराने संपूर्ण समाजाने प्रभू श्री राम स्विकारले अन् रामनामी झाले.

दरम्यान, रामनामी पंथाचे लोक आपल्या अंगावर ‘राम-राम’ असे कायमस्वरूपी टॅटू बनवतात, त्यावर राम-राम लिहिलेले कपडे घालतात, त्यावर रामाचे नाव लिहिलेला मोराच्या पिसांचा मुकुट घालतात. घराच्या भिंतींवर राम-राम लिहितात, राम-राम म्हणत एकमेकांना नमस्कार करतात. रामनमी होण्यासाठी माणसाचे आचरणही सारखेच असले पाहिजे, मांसाहार आणि दारूचा त्याग केला पाहिजे. रामनामी असणे म्हणजे केवळ गोंदणे किंवा राम-राम प्रिंट असलेले कपडे घालणे नव्हे तर एक तपश्चर्या आहे, अशी भावना या समाजामध्ये आहे.