Viral Video : छत्तीसगडची राजधानी रायपूरमधून (Raipur) मन हेलावणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. रायपूरमधल्या एका मॉलमध्ये एक्सलेटवर (Escalator) चढताना वडिलांच्या हातातून लहान मुलगा निसटला आणि थेट मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळला. या घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने मॉलमध्ये एकच खळबळ उडाली. या संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कैद झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
काय आहे नेमकी घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रायपूरमधल्या एक मॉलमध्येही दुर्देवी घटना घडली. एक व्यक्ती पत्नी आणि आपल्या दोन लहान मुलांसह मॉलमध्ये शॉपिंगमध्ये गेले होते. यात तीन ते चार वर्षांचा एक मुलगा आणि वर्षभराचा एक मुलगा होता. लहान मुलाला वडिलांनी उचलून घेतलं होतं. तर मोठा मुलगा वडिलांचा हात धरून चालत होता. हे तिघंही मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर होते. खाली जाण्यासाठी तिघं एक्सलेटरजवळ आले. यावेळी वडिल मोठ्या मुलाचा हात पकडण्यासाठी खाली वाकले,पण त्याचवेळी त्यांच्या हातातून लहान मुलगा निसटला आणि मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला.
जवळपास चाळीस फूट उंचीवरुन मुलगा खाली पडला. मुलगा खाली पडताच वडिलांना आरडाओरडा सुरु केला. धावतपळत ते खाली उतरले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला उचलून त्यांनी तात्काळ रुग्णालयात नेलं. पण उपचाराआधीच मुलाचा मृत्यू झाला होता. मुलाच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस मॉलमध्ये दाखल झाले. दुर्देवी घटनेने मॉलमध्ये एकच खळबळ उडाली होती. संपूर्ण घटना मॉलमध्ये लागलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
बदायूत डबल मर्डर
दरम्यान, उत्तर प्रदेशमधल्या बदायूंत डबल मर्डर (Budaun Double Murder) प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. बदायूंतील बाबा कॉलोनीत राहाणाऱ्या शाम विनोद ठाकूर यांच्या 13 वर्षांच्या आयुष आणि 6 वर्षांच्या अहानची गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यांच्या घरासमोर असलेल्या हेअर सलूनमध्ये काम करणाऱ्या साजिद आणि जावेद नावाच्या दोघांनी ही हत्या केली. मुख्य आरोपी असलेला साजिद पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला. तर जावेद फरार झाला आहे. चकमकीत एक पोलीस जखमी झाला.
या प्रकरणानंतर उत्तर प्रदेशमधलं वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर गावात तणावपूर्ण परिस्थिती असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुपारच्या सुमारास आयुष आणि अहानवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.