सुरक्षा दलाच्या सर्वात मोठ्या कारवाईत 29 नक्षलवाद्यांसह एका म्होरक्याचा खात्मा; 'असा' रचला सापळा

Chhattisgarh Naxal Encounter : मंगळवारी दुपारच्या सुमारास छत्तीसगडमध्ये संरक्षण दलांच्या वतीनं सर्वात मोठी कारवाई करत नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.   

सायली पाटील | Updated: Apr 17, 2024, 10:48 AM IST
सुरक्षा दलाच्या सर्वात मोठ्या कारवाईत 29 नक्षलवाद्यांसह एका म्होरक्याचा खात्मा; 'असा' रचला सापळा title=
Chhattisgarh Naxal Encounter 29 Naxalites Including Top Commander Killed In Major AntiNaxal Operation

Chhattisgarh Naxal Encounter : देशात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha election 2024) पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच काही अप्रिय घटनांनी डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला कुठंही धक्का लागणार नाही, यासाठी सज्ज असणाऱ्या यंत्रणाही अशा घटनांना मुळापासून नष्ट करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नांत असतानाच छत्तीसगडमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी नक्षलवाद विरोधी मोहिम हाती घेण्यात आली. 

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्य़ातील मतदानाआधी छत्तीसगडमध्ये सशस्त्र सुरक्षा दलानं कांकेर जिल्ह्यामध्ये केलेल्या कारवाईत एकदोन नव्हे, तब्बल 29 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. राज्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या नक्षलवादविरोधी कारवायांपैकी ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. या कारवाईदरम्यान झालेल्य़ा गोळीबारामध्ये तीन पोलीस जवान जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे.

सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफ आणि राज्य पोलिसांच्या डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्ड अर्थात डीआरजी यांच्या वतीनं संयुक्तरित्या ही मोहिम हाती घेण्यात आली होती. ज्याअंतर्गत घटनास्थळी नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. 

हेसुद्धा वाचा : महिना ₹2.5 लाख पगाराची नोकरी सोडून UPSC का? देशातून पाहिला आलेला आदित्य म्हणाला, 'केवळ मुलांची..'

सुरक्षा दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार नक्षलवादी गटातील म्होरके शंकर, ललिता, राजू आणि इतर काही नक्षलवाद्यांच्या उपस्थितीसंदर्भात माहिती मिळताच तातडीनं सूत्र हलली आणि सदरील भागाल गस्त वाढवण्यात आली. सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये यावेळी मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला, याच चकमकीत 29 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलं. यावेळी घटनास्थळावरून पोलिसांनी एके 47, .303 रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त केला. 19 एप्रिल रोजी बस्तर लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे, तर, कांकेरमधील मतदान 26 एप्रिलला पार पडणार आहे. 

दरम्यान, नक्षलवादाची समस्या मिटवण्यासाठी म्हणून सध्याच्या घडीला बस्तरमध्ये नक्षलप्रभावी परिसरामध्ये नव्या चौक्या स्थापित करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्य़ा माहितीनुसार गेल्या 4 महिन्यांमध्ये विविध कारवायांअंतर्गत 80 नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यास सुरक्षा दलाला यश मिळालं.