चांद्रयान-3 मोहिमेची लेडी बॉस! जाणून घ्या कोण आहेत ऋतु करिधाल; ISRO च्या 'रॉकेट वूमन'

Chandrayan 3 Launch: चांद्रयान-3 शुक्रवारी दुपारी 2 वाजून 35 मिनटांनी चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. या मोहिमेसाठी 615 कोटी खर्च करण्यात आले आहेत. जवळपास 50 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडिग करेल. चांद्रयान-3 च्या लँडिगची जबाबदारी महिला शास्त्रज्ञ ऋतु करिधाल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ऋतु करिधाल चांद्रयान 3 च्या मिशन डायरेक्टर म्हणून भूमिका निभावत आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jul 14, 2023, 11:31 AM IST
चांद्रयान-3 मोहिमेची लेडी बॉस! जाणून घ्या कोण आहेत ऋतु करिधाल; ISRO च्या 'रॉकेट वूमन' title=

Chandrayan 3 Launch: आज भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. संपूर्ण जगाचं लक्ष आजा भारताकडे असणार आहे. भारतातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून (Satish Dhavan Space Centre) दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3 चं लाँचिंग होणार आहे. मोहिमेसाठी 615 कोटी खर्च करण्यात आले आहेत. जवळपास 50 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडिग करेल. चांद्रयान-3 च्या लँडिगची जबाबदारी महिला शास्त्रज्ञ ऋतु करिधाल (Ritu Karidhal) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ऋतु करिधाल चांद्रयान 3 च्या मिशन डायरेक्टर म्हणून भूमिका निभावत आहेत. 

ऋतु करिधाल या मूळच्या लखनऊच्या आहेत. त्यांच्या निमित्ताने अवकाश क्षेत्रात भारतीय महिला शास्त्रज्ञांचा वाढता सहभाग समोर येत आहे. मंगलयान मिशनमध्ये आपलं कौशल्य दाखवणाऱ्या ऋतु करिधाल आता चांद्रयान-3 च्या निमित्ताने मोठी भरारी घेण्याच्या तयारीत आहेत. ऋतु करिधाल यांनी आधीच्या मिशनमध्ये केलेली कामगिरी पाहिल्यानंतरच ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. ऋतु करिधाल मंगळयान मिशनच्या डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर होत्या. चांद्रयान-2 च्या मिशन डायरेक्टरची जबाबदारी मिळाल्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. 

कोण आहेत ऋतु करिधाल ?

ऋतु करिधाल लखनऊतच लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनी लखनौ विद्यापीठातून भौतिकशास्त्रात एमएससी केले. विज्ञान आणि अवकाशात रस असल्याने त्यांनी बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रवेश घेतला. यानंतर ISRO मधून त्यांनी नोकरीस सुरुवात केली. 

2007 मध्ये ऋतु करिधाल यांना तरुण शास्त्रज्ञ पुरस्कार मिळाला आहे. वेगवेगळ्या मोहिमांमध्ये त्यांनी केलेली कामगिरी पाहता, देशातील मोठ्या शास्त्रज्ञांमध्ये त्यांना गणलं जातं. त्यांना 'रॉकेट वूमन'ही म्हटलं जातं. 

नवयुग कन्या महाविद्यालयात त्यांचं शालेय शिक्षण झालं. लखनऊ विश्वविद्यालयातून त्यांनी फिजिक्समध्ये पदवी घेतली. 1997 मध्ये त्यांनी ISRO मध्ये काम करण्यास सुरुवात केली. 

ऋतु करिधाल यांनी मिशन मंगळयान आणि मिशन चांद्रयान-2 मध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती. लहानपणापासूनच त्यांना स्पेस सायन्सची आवड होती. ऋतु करिधाल यांचा अनेक पुरस्कारांना सन्मानही करण्यात आला आहे. 

डॉ एपीजे अब्दुल कलाम तरुण शास्त्रज्ञ पुरस्कार, मार्स आर्बिटर मोहिमेसाठी इस्रो टीम अवॉर्ड, एएसआय टीम अवॉर्ड, सोसायटी ऑफ इंडियन एरोस्पेस टेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्रीजचा एरोस्पेस वुमन अचिव्हमेंट अवॉर्ड हे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 

चांद्रयान 3 ही भारताची तिसरी चांद्रयान मोहीम आहे. दुसऱ्यांदा भारत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लॅण्डींगचा प्रयत्न करणार आहे. तसेच चंद्रयान-3 मधील रोव्हर चंद्रावर उतरवून तेथील माहिती मिळवण्याचा भारतीय शास्त्रज्ञांचा प्रयत्न असेल. चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर लँड करेल तेव्हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर ही किमया करणारा भारत जगातला चौथा देश ठरेल.