Chandrayaan-3 Latest Update : इस्रोच्या प्रत्येक मोहिमेनं देशवासियांना वेगळाच अनुभव घेण्याची आणि विज्ञानाचा जवळून पाहण्याची संधी दिली आहे. नुकतंच पार पडलेलं चांद्रयान 3 चं प्रक्षेपित हे त्यातीलच एक होतं. 14 जुलै 2023 रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून प्रचंड मेहनतीनं तयार करण्यात आलेल्या आणि देशातील असंख्य नागरिकांच्या मत्त्वाकांक्षा सोबत घेवून हे यान अतिप्रचंड वेगानं अवकाशाच्या दिशेनं झेपावलं.
यानाचं प्रक्षेपण होण्याच्या क्षणापासून त्याच्या प्रत्येक हालचालीवर इस्रोनं नजर ठेवण्यास सुरुवात केली. फक्त भारतातूनच नव्हे, तर संपूर्ण जगभरातून अवकाशप्रेमींसह या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेकांनीच या जगावेगळ्या प्रवासाप्रती कुतूहल व्यक्त केलं. त्यातच Chandrayaan-3 संदर्भातील एक मोठी माहिती नुकतीच समोर आली.
Chandrayaan-3 Mission:
The orbit-raising maneuver (Earth-bound perigee firing) is performed successfully from ISTRAC/ISRO, Bengaluru.
The spacecraft is expected to attain an orbit of 127609 km x 236 km. The achieved orbit will be confirmed after the observations.
The next… pic.twitter.com/LYb4XBMaU3
— ISRO (@isro) July 25, 2023
खुद्द इस्रोकडूनच ही माहिती आणि काही अधिकृत फोटोही पोस्ट करण्यात आले. सध्याच्या घडीला चांद्रयान 3 पृथ्वीच्या पाचव्या कक्षेत असून, ते सातत्यानं पृथ्वीभोवतीच परिक्रमा घालत आहे. 25 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास चांद्रयानानं पृथ्वीच्या पाचव्या कक्षेमध्ये प्रवेश केला. यानंतरच्या टप्प्यात हे यान या कक्षेच्या बाहेर पडत चंद्राच्या रोखानं प्रवास सुरु करेल.
सध्यातरी चांद्रयान निर्धारित रुपरेषेनुसारच काम करत असून, ठरलेल्या मार्गावर ठरलेल्या दिवशी ते पोहोचतही आहे. परिणामी 31 जुलै - 1 ऑगस्टदरम्यान चांद्रयान चंद्राच्या दिशेनं त्याचा प्रवास सुरु करेल. हा तोच क्षण असेल जेव्हा ते पृथ्वीच्या कक्षा ओलांडेल. पुढील टप्प्यामध्ये ते चंद्राभोवती परिक्रमा घालेल आणि 23 ऑगस्टला ते चंद्राच्या पृष्ठावर उतरेल. चंद्राच्या पृष्ठावर चांद्रयानाची यशस्वी लँडींग म्हणजे भारतीय अवकाश क्षेत्रात सुर्वण अक्षरांमध्ये नोंद करण्याजोगा क्षण ठरणार आहे. त्यामुळं आता सर्वांनाच त्या दिवसाची प्रतीक्षा लागून राहिलीये.
काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियातील समुद्रकिनाऱ्यावर एक अशी संशयास्पद गोष्ट आढळली होती, ज्यामुळं अनेकांच्या नजरा वळल्या. प्राथमिक स्तरावर काही तर्क लावले गेले, ज्यामध्ये चांद्रयानाशी या अवशेषांचा संबंध जोडला गेला आणि एकच खळबळ माजली. पण, हे अवशेष इस्रोच्याच एका मोहिमेशी संबंधित असले तरीही चांद्रयान 3 शी त्याचा काहीही संबंध नसल्याचं इस्रोकडूनच स्पष्ट करण्यात आलं आणि याभोवती फिरणाऱ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.