नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारच्या बाजुनं मतदान करण्याबद्दलचा कोणताही व्हिप आपल्याकडून जारी करण्यात आला नव्हता... हा आपल्या नावानं कुणी तरी खोडसाळपणा केलाय... शिवसेनेकडून कोणताही व्हिप जारी करण्यात आलेला नव्हता... जो काही पक्षाचा निर्णय असेल तो आज सकाळीच जाहीर झाला, असं आश्चर्यकारक स्पष्टीकरण शिवसेना खासदार आणि मुख्य प्रतोद प्रमुख चंद्रकांत खैरे यांनी एका वाहिनीशी बोलताना दिलंय. गुरुवारी शिवसेनेच्या लेटरहेडवरून चंद्रकांत खैरेंच्या सहीसह गुरुवारी एक 'व्हिप' जारी करण्यात आला होता. यामध्ये शिवसेनेच्या खासदारांनी अविश्वास प्रस्तावादरम्यान मोदी सरकारच्या बाजूनचं मतदान करण्याचा आदेश जारी करण्यात आला होते.
यानंतर, मोदी सरकारच्या बाजूनं पक्षातील मतदान करण्याचा व्हीप खासदारांना जारी केल्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज झाले. यावरूनच त्यांनी चंद्रकांत खैरे यांना 'चीफ व्हीप' अर्थात 'मुख्य प्रतोद प्रमुख' पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिला. परंतु, लगेचच चंद्रकांत खैरे यांनी आपलं स्पष्टीकरण दिलंय.
मात्र, या घटनेमुळे पक्षातील वरिष्ठ आणि नेते यांच्यातील विसंवाद ढळढळीतपणे समोर आला आहे. आता हा व्हिप कुणी आणि कसा जाहीर केला? यावर आता पक्षात शोध सुरू आहे.