चंदीगड महापौर निवडणुकीत 'आप'चा विजय; घोटाळेबाज अनिल मसीह आहे तरी कोण?

Chandigarh Mayor Election : रिटर्निंग ऑफिसर अनिल मसीह (Anil Masih) यांनी केलेलं काम लोकशाही नियमाच्या विरुद्ध असल्याचं मत देखील सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. घोटाळेबाज अनिल मसीह आहे तरी कोण? असा सवाल विचारला जातोय.

सौरभ तळेकर | Updated: Feb 20, 2024, 06:45 PM IST
चंदीगड महापौर निवडणुकीत 'आप'चा विजय; घोटाळेबाज अनिल मसीह आहे तरी कोण? title=
Chandigarh Mayor Election Anil Masih

Who is Anil Masih : चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत (Chandigarh Mayor Election) झालेल्या घोटाळ्यावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयानेच (Supreme Court) चंदीगडच्या महापौर पदाच्या निवडणुकीतील आपचे उमेदवार कुलदीप कुमार (Kuldeep kumar) यांना विजयी उमेदवार घोषित केलं आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वातील तीन सदस्यीय खंडपीठाने सुनावणी करताना हा निर्णय दिलाय. त्यावेळी रिटर्निंग ऑफिसर अनिल मसीह (Anil Masih) यांनी केलेलं काम लोकशाही नियमाच्या विरुद्ध असल्याचं मत देखील सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. अशातच आता बॅलेट पेपर टेम्परिंग (Ballot paper tempering) प्रकरणातील घोटाळेबाज अनिल मसीह आहे तरी कोण? असा सवाल विचारला जातोय.

चंदीगड महापालिकेच्या महापौर निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्याने आप आणि काँग्रेसची मते अपात्र ठरवत मोठी अफरातफर केली होती. त्यावर आपने आक्षेप नोंदवला अन् पुराव्यासह सर्वोच्च न्यायालयात केस उभा केली होती. सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये अनिल मसीह या अधिकाऱ्याने बॅलेट पेपरवर क्रॉस करून मतं बाद ठरविल्याचं कबुल केलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अवमानाची नोटीस पाठवली आहे. मात्र, अनिल मसीह हे पहिल्यांदाच अशा वादात सापडलेत असं नाही.

अनिल मसीह आहे तरी कोण?

अनिल मसीह यांच्यावर चंदीगड महापौर निवडणुकीत बॅलेट पेपरने फसवणूक केल्याचा आरोप आहे. काही वर्षांपूर्वी 53 वर्षीय मसीह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीसोबत त्यांचा संबंध आहे. त्यांना चंदीगडच्या 2021 मधील महापालिका निवडणुकीत तिकीट मिळण्याची शक्यता होती. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. त्यानंतर भाजपने मसीह यांची अल्पसंख्याक मोर्चाच्या महासचिवपदी नियुक्ती केली होती. समोर आलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये चर्चमध्ये अपशब्द वापरल्यानंतर त्याच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. एवढंच नाही तर, अनिल मसीह यांची पत्नी पंजाब इंजिनिअरिंग हॉस्टेलच्या मुलींच्या वसतिगृहाची व्यवस्थापक आहे.

नेमकं प्रकरण काय?

चंदीगडमध्ये 30 जानेवारी रोजी महापौरपदासाठी मतदान झालं होतं. यामध्ये भाजपचे मनोज सोनकर यांना 16 तर आप आणि काँग्रेसचे संयुक्त उमेदवार कुलदीप कुमार यांना 12 मतं मिळाली होती. यावेळी अनिल मसीह यांनी एकूण 8 मतं अवैध ठरवली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ही बाब उघड झाली होती. त्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. चंदीगड महापालिकेत एकूण 36 नगरसेवक आहेत. नगराध्यक्षपदासाठी 19 मतांची आवश्यकता आहे. मात्र, 8 मतं बाद केल्याने मोठा गोंधळ उडाला होता. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाने देशाच्या इतिहासात प्रथमच कोणा एका उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आलंय.