चाळीसगाव : जम्मू- काश्मीरमध्ये तैनात बीएसएफचे जवान अमित साहेबराव पाटील कर्तव्यावर असताना त्यांच्यावर बर्फाची लादी पडून अपघात झाला होता. त्यानंतर आज सकाळी 6 वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर आठवड्याभरापासून उपचार सुरु होते. चाळीसगावचा आणखी एक जवान गेल्याने तालुक्यावर पुन्हा शोककळा पसरली आहे.
वाकडी येथील साहेबराव नथु पाटील यांचे मोठे चिरंजीव असलेले अमित साहेबराव पाटील हे 2010 मध्ये बीएसएफमध्ये दाखल झाले होते. जम्मू-काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना आठ दिवसांपूर्वी त्यांच्या अंगावर बर्फाची लादी कोसळली होती. त्याच्यावर बीएसएफच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. शहीद जवान अमित पाटील यांचे कुटुंब शेतकरी असून ते सर्वसामान्य कुटुंबातून होते. त्यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि लहान भाऊ असं कुटुंब आहे.
शहीद जवान अमित पाटील यांचे पार्थिव आज रात्रीपर्यंत पुण्यात येणार आहे. त्यानंतर ते चाळीसगाव येथील त्यांच्या गावी पोहोचणार आहे. उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.