मुंबई : सोशल मीडियामध्ये लोकप्रिय असलेल्या टिकटॉक आणि हॅलो या दोन अॅप्लिकेशनवर लवकरच बंदी येण्याची शक्यता आहे. टिकटॉक आणि हॅलो हे दोनही अॅप चिनी कंपन्यांनी तयार केलेली आहेत. या दोन्ही कंपन्यांना केंद्र सरकारने नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये केंद्र सरकारने २४ प्रश्न विचारले असून, त्यांची उत्तर देण्यासाठी २२ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
कंपन्यांकडून समाधानकारक उत्तरे आली नाहीत तर या अॅप्लिकेशनवर सरकार बंदी घालू शकते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित स्वदेशी जागरण मंचने या दोन्ही अॅपविरोधात तक्रार केली. या दोन्ही चिनी कंपन्यांच्या अॅपमुळे देशविरोधी आणि बेकायदा कारवाया वाढल्या असल्याची तक्रार थेट पंतप्रधान मोदींकडे करण्यात आली होती.
निवडणुकीच्या काळात हॅलो अॅप्लिकेशनने सोशल मीडियावर ज्या ११ हजार बनावट जाहिराती दिल्या, त्यासाठीच्या पैशांचा हिशेबही मागण्यात आला. एवढंच नाही तर हे अॅप्लिकेशन वापरण्यासाठी १३ वर्ष वयाची अट का घालण्यात आली आहे? ही अट १८ वर्षं का नाही? असे सवालही करण्यात आले आहेत.
टिक-टॉकचा गैरवापर होत असून काही अश्लील व्हिडिओ देखील पोस्ट केले जातात. यामुळे टिक-टॉकवर बंदी आणावी, अशी मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयात, दाखल करण्यात आली होती. 'टिकटॉक'वर काही महिन्यांपूर्वी बंदी घालण्यात आली होती. मात्र टिक-टॉक अॅपवर बंदी घालण्याच्या मद्रास न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने तुर्तास स्थगिती दिली आहे.
आता या दोनही कंपन्या केंद्र सरकारच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.