सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी, आता मिळणार एडवान्स पगार आणि पेन्शन

या निर्णयाचा फायदा हा अनेक विभागातील कर्मचाऱ्यांना होणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.  

Updated: Aug 14, 2021, 07:36 PM IST
सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी, आता मिळणार एडवान्स पगार आणि पेन्शन title=

मुंबई : ऑगस्ट महिन्यापासून सणासुदीच्या हंगामाला सुरूवात झाली आहे. ओणम, रक्षाबंधन आणि गणेश चतुर्थीसह नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये दिवाळी आणि ख्रिसमस सारखे मोठे सणोत्सव आहेत. या सणोत्सवात पैशाची काळजी न करता मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. कोरोना काळात अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे अनेक जण विचारपूर्वक पैसे खर्च करत आहेत. मात्र लोकांना पैशाची कोणतीही अडचण येऊ नये तसेच मोठ्या प्रमाणात खरेदी करता यावी, यासाठी सरकारने विशेष तयारी केली आहे. मोदी सरकार अर्थव्यवस्थेला वेग देण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना आगाऊ पगार आणि पेन्शन देणार असल्याचं म्हटलं जात आहे. (Central Government will provide advance salaries and pensions to Central employees and pensioners during the festive season)
 
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अर्थ मंत्रालयाने संपूर्ण तयारी केली आहे. सीएनबीसी आवाजच्या रिपोर्टनुसार, कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक चणचणीचा सामना करावा लागू नये यासाठी पगार आणि पेन्शन एडवान्स देण्यात येणार आहे. केरळमधील केंद्रीय कर्मचाऱ्यांना 19 ऑगस्टला एडव्हान्स पगार देण्याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. ओणम हा केरळमधील सर्वात मोठा सण आहे जो मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

ओणमच्या निमित्ताने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आगाऊ पगार दिला जात आहे. अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार केरळनंतर महाराष्ट्रातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्रात गणेश चतुर्थीचा मोठा सण सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे.
 
महाराष्ट्र आणि केरळसाठी आदेश

महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. घरात गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते. त्यामुळे त्याआधी घरात दुरुस्तीची कामं केली जातात.  केरळमध्ये 18 ऑगस्टला तर महाराष्ट्रात 19 सप्टेंबरला केंद्रीय कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या निर्णयाचा केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांनाही फायदा होणार आहे. सरकारला आलेल्या आदेशानुसार, रिझर्व्ह बँकेला निर्देश देण्यात आले आहेत की सणाोत्सोवाचा काळ लक्षात ठेवता  बँकांनी त्यांच्या पेन्शनधारकांना पेन्शन द्यावे.

या निर्णयाचा फायदा कोणकोणच्या कर्मचाऱ्यांना?

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा हा संरक्षण, पोस्ट, दूरसंचार विभागातील कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.