राजनाथ सिंहांचा कॅबिनेट समित्यांत समावेश... नाट्यपूर्ण घडामोडींचा सिलसिला

'वजन घटल्याच्या' बातम्यांनंतर राजनाथ सिंहांच्या जबाबदाऱ्या वाढल्या 

Updated: Jun 7, 2019, 10:05 AM IST
राजनाथ सिंहांचा कॅबिनेट समित्यांत समावेश... नाट्यपूर्ण घडामोडींचा सिलसिला title=

नवी दिल्ली : 'मोदी सरकार - २'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी वेगवेगळी कॅबिनेट प्रकरणं हाताळण्यासाठी आठ समित्या स्थापन केल्या. उल्लेखनीय म्हणजे, या आठही समित्यांमध्ये गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश होता मात्र भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांना दोनच समित्यांमध्ये स्थान मिळालं. राजनैतिक आणि संसदीय प्रकरणांसारख्या महत्त्वाच्या समित्यांमध्ये राजनाथ सिंह यांना स्थान देण्यात आलं नव्हतं. अर्थातच, मीडियांतून या बातम्या येताना राजनाथ सिंह यांचं वजन 'मोदी-शाह सरकार'च्या काळात कमी झालंय का? असा सूर निघाला. त्यानंतर काही तासांतच गुरुवारी रात्री उशिरा कॅबिनेट समित्यांची एक नवी यादी तयार करण्यात आली. या यादीत राजनाथ सिंह यांना दोन नाही तर सहा समित्यांमध्ये सहभागी करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं.

पंतप्रधान मोदींचा सहा तर शाहांचा आठही समित्यांमध्ये सहभाग

उल्लेखनीय म्हणजे, अमित शाह हे २०१९ साली पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढून संसदेत पोहचलेत. त्यांचा समावेश आठही समित्यांमध्ये करण्यात आलाय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा कॅबिनेट समित्यांचा भाग आहेत. इतकंच नाही तर मोदी सरकार २ मध्ये राजनाथ सिंह यांच्याकडे असलेली गृहमंत्रालयाची जबाबदारी काढून ती अमित शाह यांना देण्यात आलीय... आणि राजनाथ सिंह यांना सुरक्षा मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली.

गृहमंत्री अमित शाह यांचा सर्व अर्थात आठही समित्यांमध्ये सहभाग आहे. त्यांच्यानंतर सर्वात जास्त म्हणजे सात कॅबिनेट समित्यांत अर्थमंत्री निर्मला सीतारमण, पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा समित्यांत, पीयूष गोयल यांचा पाच समित्यांत तर नितीन गडकरी, नरेंद्र सिंह तोमर यांचा चार-चार समित्यांत समावेश करण्यात आलाय.

सहा समित्यांमध्ये राजनाथ सिंह यांचा समावेश

आता मात्र, राजनाथ सिंह यांना अगोदर आर्थिक प्रकरणातील कॅबिनेट समिती तसंच सुरक्षा प्रकरणाची कॅबिनेट समिती या दोन समित्यांमध्ये जागा मिळाली होती. गुरुवारी रात्री त्यांच्यावर आणखीन जबाबदारी सोपवत त्यांची संसदीय प्रकरणाची कॅबिनेट समिती, राजनैतिक प्रकरणाची कॅबिनेट समिती, गुंतवणूक आणि विकासासंबंधी कॅबिनेट समिती, रोजगार आणि कौशल्यविकास कॅबिनेट समिती या आणखी चार समित्यांमध्ये जागा मिळालीय.