नवी दिल्ली : उत्तर- पूर्व Delhi दिल्लीमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचाराचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. साऱ्या देशातून या फोटोंवर संतप्त आणि खेद व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. मन हेलावून टाकणाऱ्या या फोटोंमध्येच सर्वाधिक व्हायरल होणारा एक फोटो म्हणजे लाल रंगाचं टी शर्ट घातलेल्या तरुणाचा.
व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये युवकाच्या हाती एक पिस्तुल दिसत असून, त्याने पोलिस अधिकाऱ्यांच्या दिशेने हे पिस्तुल रोखून धरलं आहे. दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख असं त्या तरुणाचं नाव आहे.
उत्तर पूर्वीय दिल्लीमघ्ये झालेल्या या हिंसाचारात आतापर्यंत सहाजणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. दिल्लीच्या पोलिस आयुक्तांकडून सर्व भागातील अधिकाऱ्यांना कोणत्याही ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना न होऊ देता परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीतील संपूर्ण पोलिस यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय धार्मिक स्थळांवरील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.
वाचा : ...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी
का उसळला हिंसाचार?
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (CAA)सोमवारी दिल्लीत प्रचंड तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. येथे झालेल्या हिंसाचारात एका पोलीस कर्मचाऱ्याचाही मृत्यू झाला. तर शाहदराचे पोलीस उपायुक्त अमित शर्मा हिंसाचारात गंभीर जखमी झाले. दिल्लीतील अनेक भागांमध्ये सोमवारी CAA समर्थक आणि विरोधकांची टक्कर झाली. भजनपुरा, मौजपूर आणि गोकुळपुरीमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले. यादरम्यानच गोकुळपुरी येथे झालेल्या तुफान दगडफेकीत हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनाक्रमानंतर दिल्लीत जवळपास १० ठिकाणांवर जमावबंदी लागू करण्यात आली.