मुंबई : यावर्षाच्या सुरुवातीलाच भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांच्या पैशांचा घोटाळा समोर आला होता. त्यानंतर दूरसंचार विभागानंही (डॉट) आर्थिक पेचात सापडलेल्या बीएसएनएलला पैसे देण्यासाठी नकार दिला होता. त्यामुळेच बीएसएनएल या कंपनीकडे आपल्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठीही पैसे उरलेले नाहीत. बीएसएनएलच्या १.७६ लाख कर्मचाऱ्यांचा फेब्रुवारी महिन्याचा पगार अजूनही कर्मचाऱ्यांच्या हातात पडलेला नाही. कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच कंपनीवर अशा नामुष्कीची वेळ आलीय. त्यामुळेच देशभरात कार्यरत असलेल्या बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी आपला रोष व्यक्त करत केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केलीय.
बीएसएनएल कर्मचारी संघानं दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांना पत्र लिहून सरकारकडे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची तसंच या कंपनीला पुनरुज्जीवन देण्याची मागणी केलीय. 'रिलायन्स जिओ'च्या मूल्य निर्धारणामुळे दूरसंचार उद्योगाची आर्थिक स्थिती कोसळल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय. बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांचे पीएफचे पैसेही वेळेवर भरले जात नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय.
वेळेवर पगार हातात न पडल्यानं कर्मचाऱ्यांना चिंतेनं ग्रासलंय. बीएसएनएलची कर्मचारी असल्याचं सांगणाऱ्या एका महिलेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात ती आपली विवंचना व्यक्त करताना दिसतेय.
Look what Modi did to this, he intentionally collapsed BSNL to help Ambani’s reliance telecom.
Do watch this video of a bsnl employee and decide yourself if you want to vote for #NarendraModi again. pic.twitter.com/dXVmICpQO0— Yuva Desh (@yuvadesh) March 14, 2019
यानंतर 'बीएसएनएल'ला नियंत्रित करणाऱ्या दूरसंचार विभागानं वेगानं हालचाली करत भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या अधिकारी आणि कर्मचारी युनियनला होळीपूर्वी सर्वांना वेतन मिळण्यासाठी ८५० करोड रुपये देण्याचं आश्वासन दिलंय.
तर, दिल्ली आणि मुंबईत काम करणाऱ्या महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल)च्या २३०० कर्मचाऱ्यांच्या वेतन थकबाकीसाठी १७१ करोड रुपये दूरसंचार विभागानं जारी केले आहेत... बुधवारपासून एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांना त्यांचं थकीत वेतन देण्यास सुरुवात केली जाणार आहे. एमटीएनएल कर्मचाऱ्यांच्या पगाराचा सर्व खर्च दूरसंचार विभागाकडून केला जातो.