कर्नाटकातील येडियुरप्पा सरकार बहुमत परीक्षणात पास

१७ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवल्यामुळे कर्नाटक विधानसभेत बहुमताचा आकडा कमी झाला होता.

Updated: Jul 29, 2019, 12:07 PM IST
कर्नाटकातील येडियुरप्पा सरकार बहुमत परीक्षणात पास title=

बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी आज सकाळी विश्वासदर्शक प्रस्ताव विधानसभेत मांडला. सकाळी ११ वाजता विधानसभेच्या कामकाजाला सुरूवात झाल्यावर येडीयुरप्पांनी विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला. येडियुरप्पा यांच्याकडे बहुमत असल्याने त्यांचं सरकार पास झालं आहे. १७ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवल्यामुळे कर्नाटक विधानसभेची सदस्यसंख्या २२५ वरून २०८ वर आली होती. अध्यक्षांना वगळता ही संख्या २०७ होते. त्यामुळे बहुमताचा आकडा १०४ होता. भाजपकडे सध्या स्वतःचे १०५ आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी बहुमत सिद्ध केलं आहे.

काँग्रेसकडं ६६, जेडीएसकडे ३४ आणि बसपाकडे एक सदस्य आहे. दरम्यान, काल कर्नाटक विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी काँग्रेस आणि जेडीएसच्या १४ आमदारांना अपात्र ठरवलं आहे. त्यामुळं या विधानसभेचा कार्यकाल संपेपर्यंत या आमदारांना निवडणूकही लढवता येणार नाही. या निर्णयाविरोधात या सर्व आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे. यापूर्वीच तीन आमदारांना अपात्र ठरवण्यात आल्यामुळं एकूण अपात्र आमदारांची संख्या १७ वर पोहोचली आहे.

येडियुरप्पा सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर विरोधी पक्षाने मत विभाजनाची मागणी नाही केली. येडियुरप्पा सरकारने कामकाजाला सुरुवात केली आहे.

माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी म्हटलं की, 'तुम्ही आता सरकारमध्ये आहात. त्यामुळे आमदारांवर राजीनाम्यासाठी दबाव टाकणं बंद करा. तुमचं सरकार जर चांगलं काम करेल तर मी तुमचं समर्थन करेल.'