7 वर्षाच्या मुलीकडून 20 रुपयांचा गुटखा आणि चिप्स मागवले, नंतर घरातच...; सख्ख्या भावांच्या कृत्याने खळबळ

उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे एका 7 वर्षाच्या चिमुरडीची बलात्कारानंतर गळा दाबून हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी दोन सख्ख्या भावांना बेड्या ठोकल्या आहेत.  

शिवराज यादव | Updated: Sep 28, 2023, 05:56 PM IST
7 वर्षाच्या मुलीकडून 20 रुपयांचा गुटखा आणि चिप्स मागवले, नंतर घरातच...; सख्ख्या भावांच्या कृत्याने खळबळ title=

उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली. गळा दाबून अत्यंत निर्घृणपणे चिमुरडीला ठार करण्यात आलं. पोलिसांनी याप्रकरणी दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. आपल्याच घरात त्यांनी हे कृत्य केलं. घटना समोर आल्यानंतर परिसरात संतापाचं वातावरण आहे. आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 

कोतवाली पोलीस ठाण्याच्या तुर्कमान गेट येथे काही दिवसांपूर्वी 7 वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला होता. मुलीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं असता पोलीसही हादरले होते. कारण मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. 

अलीगढ शहराचे पोलीस अधीक्षक मृगांक शेखर पाठक यांनी सांगितलं आहे की, कोतवाली ठाणे क्षेत्रातील तुर्कमान गेट येथील 7 वर्षीय मुलगी सकाळपासून बेपत्ता होती. तिच्या आई-वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरु केला होता. तपासादरम्यान सीसीटीव्हीदेखील तपासण्यात आले. यावेळी  मुलगी शेजारी राहणाऱ्या सुआलीनच्या घरात गेल्याचं दिसलं. 

यानंतर पोलिसांनी त्यांच्या घऱात जाऊन तपासणी केली असता एका पोत्यात मृतदेह सापडला. यानंत पोलिसांनी सुआलीन आणि त्याच्या भावाला अटक केली. अटक केल्यानंतर पोलिसांनी कसून त्यांची चौकशी केली. यावेळी त्यांनी संपूर्ण घटनाक्रम उलगडला.

बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोन्ही भाऊ अटक

मुख्य आरोपी सुआलीनने पोलीस चौकशीत सांगितलं की, त्यांनी मुलीला 20 रुपये देऊन गुटखा आणि चिप्स मागवले होते. यानंतर मात्र आरोपींनी सर्व मर्यादा ओलांडत मुलीवर अत्याचार केले. पोलिसानी दोन्ही सख्ख्या भावांना अटक केली असून, कोर्टात हजर केलं. यानंतर त्यांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. 

या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा दिली जावी अशी स्थानिकांची मागणी आहे.