उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमध्ये कन्नौज जिल्ह्यात एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. लग्नाच्या विधी सुरू असताना वधूचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना थाथिया पोलीस स्थानक परिसरात येणाऱ्या भगवतपुरवा गावातील असल्याचे समजत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. वर संजय शुक्रवारी रात्री त्याच्या नातेवाईकांसोबत १९ वर्षीय विनीतासोबत लग्न करण्यासाठी पोहोचला होता.
परंतु लग्नाच्या विधी सुरू असताना अचानक विनीताला अस्वस्थ वाटू लागलं आणि ती बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात घेवून जाण्यात आले. परंतु तिला रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. सर्वप्रथम तुम्ही रुग्णाचे कोरोना निगेटिव्ह असलेले रिपोर्ट सादर करा. त्यानंतर आम्ही उपचार करु. असं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं.
त्यानंतर विनीताचे वडील किशोर बाथम मुलीला घेवून कानपूरच्या रुग्णालयात जात असताना तिची प्रकृती अधिक खालावली. अखेर रुग्णालयात पोहचू न शकल्यामुळे तिने अखेरचा श्वास घेतला. शनिवारी विनीतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.