Crime News Today: भोंदूबाबाने महिलांकडून किंवा भाविकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्याच असतील. मात्र, दोन तरुणांनी चक्का एका ज्योतिषाचार्यालाच फसवले आहे. दोन तरुण ज्योतिषाचार्याकडे पत्रिका घेऊन गेले. गर्लफ्रेंड सतत नाराज राहते त्यावर उपाय सांगा, असा बहाणा करुन दोघे तरुण ज्योतिषांकडे गेले. मात्र त्याचवेळी त्यांच्या डोक्यात वेगळाच प्लान शिजत होता. कानपूरमध्ये ही घटना घडली आहे.
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. एका प्रतिष्ठित ज्योतिषाकडे दोन तरुण पत्रिका दाखवण्याचा बहाणा करुन आले. दोघांच्याही प्रेयसी सतत नाराज असतात त्यावर काही उपाय सांगा असं म्हणत त्यांनी ज्योतिषांचा विश्वास मिळवला. तेव्हा ज्योतिषांने त्यांना 4 ऑक्टोबर रोजी येण्यास सांगितले. मात्र दोघेही त्याआधीच म्हणजे सोमवारी आले.
ज्योतिषाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळेत ते दोघेही आले तेव्हा ते घरी एकटेच होते. त्यांच्याशी बोलत असताना अचानक त्यातील एकाने बॅगेतून कोल्डड्रिंकची बॉटल काढली आणि ग्लासमध्ये ओतून मला पिण्यासाठी दिली. ते पिताच माझी शुद्ध हरपली. मी बेशुद्ध झाल्यानंतर दोन तरुणांनी घरातील लाखो रुपयांची रक्कम, दागिने, दोन मोबाईल फोनसह अन्य किमती सामान लंपास करत फरार झाले, असं ज्योतिषाने सांगितले आहे.
इतकंच नव्हे तर, भामट्यांनी घरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरा आणि डिव्हीआरही चोरी करुन घेऊन गेले आहेत. शुद्ध आल्यानंतर त्यांना घरातील सामान अस्यावस्त पडल्याने लक्षात आल्यानंतर त्यांनी घरात जाऊन पाहणी केली. तेव्हा घरातील सगळं सामान चोरीला गेले होते. ज्योतिषतज्ज्ञांनी लगेचच पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.