Nora Fatehi Thanks PM Modi: बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्स क्वीन म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री नोरा फतेहीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. नोराने पंतप्रधान मोदींचे आभार मानणारी एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. आपल्या देशातील लोकांसाठी पंतप्रधान मोदींनी मदतीचा हात पुढे केल्याने नोराने मोदींचे आभार मानले आहेत. मोरक्कोमध्ये शनिवारी मोठा भूकंप झाला. या भूकंपामुळे मोरक्कोमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. रबात आणि कैसाब्लांका सहीत मोरक्कोमधील अनेक शहरांमध्ये भूकंपामुळे एकूण 2000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. नोरा ही स्वत: मोरक्कोची नागरिक आहे. त्यामुळेच तिने पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.
शनिवारी जी-20 परिषदेसाठी जगभरातील नेते भारतात आलेले असतानाच पंतप्रधान मोदींनी मोरक्कोमधील भूकंपाबद्दल 'एक्स'वरुन (ट्विटरवरुन) आपल्या भावना व्यक्त केल्या. मोरक्को देश शनिवारी पहाटे 6.8 तीव्रतेच्या भूकंपाने हादरला. यानंतर मोदींनी या भूकंपासंदर्भात आपल्या भावना व्यक्त करताना, "मोरक्कोमध्ये भूकंपामुळे जिवीत आणि वित्तहानी झाल्याने फार दु:ख झालं आहे. या संकटाच्या प्रसंगी माझ्या संवेदना मोरक्कोमधील लोकांबरोबर आहेत," असं म्हटलं. "आपल्या प्रिय व्यक्तींना गमावलेल्यांबरोबर माझ्या संवेदना आहेत. जखमी लोकांना लवकरात लवकर आराम मिळो. भारत या कठीण काळात मोरक्कोला हवी ती सर्व मदत देण्यास तयार आहे," असंही मोदींनी म्हटलं.
मोदींनी केलेल्या या पोस्टचा स्क्रीनशॉट नोराने शेअर केला आहे. नोरीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून मोदींचे आभार मानले. "या मोठ्या पाठिंब्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानते. तुम्ही यासंदर्भात भावना व्यक्त करणाऱ्या आणि मदतीचा हात पुढे करणाऱ्या पहिल्या काही मोजक्या देशांपैकी एक आहात. मोरक्कोमधील लोकांच्या वतीने मी तुमचे आभार मानते. जय हिंद!" असा कॅप्शनसहीत नोराने मोदींच्या ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. नोरा सध्या भारतात असून तिच्या 'क्रॅक', 'मटका', 'मडगाव एक्सप्रेस' आणि 'डान्सिंग डॅड' या चित्रपटांच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे.
मोरोक्कोतील विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या 2 हजारांहून अधिक झाली आहे. किमान 2 हजार 59 लोक जखमी झाल्याची माहिती देशाच्या गृह मंत्रालयाने दिली. रविवारपर्यंत मोरोक्कोमधील या भूकंपामध्ये 2 हजार 12 नागरिक मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाचा सर्वाधिक फटका मोरक्कोमधील दुर्गम भागाला बसला आहे. तेथे बचावपथकांना पोहोचण्यासाठी अडथळे येत आहेत. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून बचावकार्य वेगाने सुरु आहे. इतर देशांनीही मोरक्कोला मदत पाठवली आहे.