'दिल्लीत जीन्स, खेड्यात साडी', भाजप नेत्याची प्रियांकांवर टीका

प्रियांका समर्थकांकडून तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त 

Updated: Feb 10, 2019, 04:57 PM IST
'दिल्लीत जीन्स, खेड्यात साडी', भाजप नेत्याची प्रियांकांवर टीका  title=

बस्ती : आगामी लोकसभा निवडणूका नजरेत घेता देशाच्या राजकारणात दर दिवसाआड काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्यातच काँग्रेस पक्षाममध्ये काही दिवसांपूर्वीच एका अशा व्यक्तीला महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली ती पाहता ही व्यक्ती डाव पलटू शकते अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. ती व्यक्ती म्हणजे प्रियांका गांधी. त्या राजकारणात सक्रीय झाल्यापासून विरोधी पक्षांकडून बरेच आरोप आणि संतप्त प्रतिक्रिया, टोलेबाजीचं सत्र या साऱ्याला उधाण आल्याचं पाहायला मिळालं. त्यात आता आणखी एक नेत्याचा समावेश झाला आहे. भाजप नेता बरिश द्वीवेदी यांनी प्रियांका यांना निशाण्यावर घेत त्यांच्या राजकीय प्रवेशावर आणि काँग्रेसच्या राजकीय खेळीवर टीका केली आहे. 

'दिल्लीमध्ये असताना प्रियांका नेहमीच जीन्स आणि टॉप घालतात, पण खेड्याच्या भागात येताना मात्र त्या साडी नेसतात, कुंकू लावतात; असा त्यांचा लूक असतो', अशी विचित्र टीका त्यांनी केली. उत्तर प्रदेशच्या बस्ती येथे ते माध्यमांशी संवाद साधत होते. त्यांची ही टीका पाहता नेतेमंडळींनी गेल्या काही काळापासून बऱ्याच मर्यादा सोडून प्रियांका गांधी यांच्याविषयी प्रतिक्रिया देण्याचं सत्र सुरू केल्याची नाराजी प्रियांका समर्थकांकडून तीव्र शब्दांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे. 

काँग्रेसच्या महासचिवपदाची जबाबदारी काही दिवसांपूर्वीच खुदद् राहुल गांधी यांनी प्रियांका यांच्याकडे सोपवली. ज्यानंतर त्यांच्याकडून येत्या काळात चांगल्या कामाची अपेक्षा असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. एकीकडून काँग्रेसच्या महासचिवपदी असणाऱ्या प्रियांका गांधी यांच्या कारकिर्दीकडे अनेकांचच लक्ष लागलेलं असतानाच दुसरीकडे त्यांच्यावर होणारा टीकांचा भडीमार या साऱ्यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापताना दिसत आहे.